गवंडी आणि मजुरांच्या रोजगारासाठी राष्ट्रवादी आक्रमक
रेतीघाट सुरू करण्याठी व अवैध रेती तस्करीबाबत राष्ट्रवादीचे निवेदन
निकेश जिलठे, वणी: रेतीघाट सुरू न झाल्याने मजूर, गवंडी व बांधकाम करणाऱ्या सर्वसामान्यांना याचा फटका बसला आहे. त्यामुळे रेतीघाट त्वरित सुरू करा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज दिनांक 2 जानेवारीला याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले. रेतीघात सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदनातून दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा व राष्ट्रवादी काँग्रेसचे वणी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष जयसिंग गोहोकार यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते व मजुरांनी उपविभागिय अधिकारी यांना निवेदन दिले.
दरवर्षी दिवाळीनंतर रेतीघाट हर्रास करून खुले केले जातात. मात्र यावर्षी जानेवारी महिना सुरू झाला तरी अद्याप रेतीघाट सुरू करण्यात आलेले नाही. या रेतीघाटावर शेकडो कुटुंब अवलंबून आहे. यात गवंडी, बांधकाम मजूर, ट्रॅक्टर मजूर इत्यादींचा समावेश आहे. रेतीघाट सुरू न झाल्याने या मजूर वर्गावर उपासमारीची पाळी आली आहे.
लोकांनी घर बांधण्यासाठी बँकेचे लोन उचलले आहे. त्यांनी बांधकाम सुरूही केले होते. मात्र रेती मिळत नसल्याने हे बांधकाम थंडावले आहे. मात्र काम ठप्प असूनही बँकेचा कर्जाचा हप्ता सुरू आहे. याचा मध्यमवर्गीय लोकांना चांगलाच फटका बसला आहे. तर दुसरीकडे रेतीघाट बंद असल्याने अवैधरित्या रेतीच्या उत्खनणाला ऊत आला आहे. त्यामुळे शासनाचा महसूल तर बुडत आहे शिवाय पर्यावरणाचे नुकसान होत आहे.
ही अवैध रेती अव्वाच्या सव्वा भावाने विकली जात आहे. त्यामुळे सध्या बांधकाम करणारे ही रेती अवैधरित्या जास्त पैसे घेऊन खरेदी करीत आहे. हे अवैध कामं त्वरित बंद होणे गरजेचे आहे. जर रेतीघाट सुरू केले तर बांधकाम व्यावसायिकांना वैधरित्या रेती खरेदी करता येईल. शिवाय बांधकाम सुरू झाल्याने मजूर वर्गालाही मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल.
प्रशासन मार्च महिण्यात रेतीघाट सुरू करणार असे बोलत आहे. मात्र उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या असते. त्यामुळे या काळात बांधकाम शक्यतो बंद असते. त्यामुळे हा निर्णय कुठेही फायदेशीर ठरणारा नाही. जर रेतीघाट सुरू केले नाही तर त्यावर अवलंबून असणाऱ्या मजूर, गवंडी इत्यादींच्या रोजगाराची पर्यायी व्यवस्था प्रशासनाने करून द्यावी. जर लवकरात लवकरत प्रशासनाने निर्णय घेऊन रेतीघाट सुरू केले नाही, तर सर्व मजूर आणि गवंडी वर्गाला सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस तहसिल कार्यालयासमोर घमेले आणि फावडे घेऊन तीव्र आंदोलन पुकारेल. असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
वणी बहुगुणीशी बोलताना डॉ. महेंद्र लोढा म्हणाले की…
मजूर वर्ग व गवंडी सर्व प्रकारचे बांधकाम करतात. जर प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास हेच मजूर सरकारचे थडगे बांधणार. सध्या अवैधरित्या रेतीचा उपसा करणारा रेती तस्कर राजरोसपणे रेतीचा उपसा करीत आहे. आम्ही काही दिवस वाट बघू जर प्रशासनाने योग्य पाऊल उचलले नाही तर सर्व मजूर, गवंडी यांना सोबत घेऊन रेती घाटावरची रेती उचलू असा इशारा यावेळी डॉ. लोढा यांनी दिला.
निवेदन देते वेळी डॉ. महेंद्र लोढा, जयसिंग गोहोकार, राजाभाऊ बिलोरिया, आशाताई टोंगे, पूजा गढवाल, हेमलता लामगे, विजयी आगबत्तलवार, संगीता खटोड, महेश पिदूरकर, स्वप्निल धुर्वे, अंकुश मापूर, सोनू निमसटकर, मारोती मोहाडे, प्रमोद एडलावार, सैयद रविश, महादेव काकडे, राजू उपरकर, संतोष आत्रम, राजू पाचभाई, भास्कर पिंपळकर, योगेश खुटेमाटे, भास्कर आत्राम दिलिप जेनेकर, रमेश बावणे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, मजूरवर्ग, ठेकेदार, ट्रॅक्टर चालक इत्यादी उपस्थित होते.