पांडरदेवी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा बुथ सदस्यांचा मेळावा
200 बुथ पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती
ज्योतिबा पोटे, मारेगाव: तालुक्यातील पांडरदेवी येथे रविवारी दिनांक 21 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे बोटोणी-वेगाव सर्कल येथील गावातील बुथ प्रमुखांचे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या मेळाव्याला बुथ प्रमुख व बुथ सदस्य असे सुमारे 200 कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा हे प्रमुख मार्गदर्शक होते.
यावेळी बोटोणी-वेगाव सर्कलमधील संपूर्ण बुथविषयी माहिती घेऊन कमिटी कशी तयार करणे, बुथ बांधणी केवळ निवडणुकीपरती मर्यादीत न बनवता लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि शेवटच्या व्यक्तीची समस्येची दखल घेऊन त्या समस्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवून समस्या कशा सोडवाव्यात. बुथ प्रमुख व कमिटीची यंत्रणा कशी राबवावी याविषयी डॉ. महेंद्र लोढा यांनी मार्गदर्शन केले.
तर मार्गदर्शन करताना भारत मत्ते म्हणाले की कार्यकर्त्यांनी गावातील प्रत्येक नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या समस्या स्थानिक पातळीवर सोडविल्या पाहिजे. गावातील प्रत्येक बुथ प्रमुख आणि सदस्यांनी जनसंपर्क वाढवून मतदारांशी अधिकाधिक संवाद साधणे आवश्यक आहे.
यावेळी महेश पिदूरकर, संदीप धवणे, नितीन गोडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश मापूर यांनी केले. आभार दयाळ रोगे यांनी मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी बोटोणी-वेगाव सर्कलमधील बुथ प्रमुख व कमिटी सदस्य व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.