रंग, बटाटे, कांदे, चमचे, मणी, कपांतून बेरीज-वजाबाकीचे शिक्षण
विशेष मुलांना कृतियुक्त शिक्षणातून स्वावलंबनाचे धडे
जयंत सोनोने, अमरावती: घरात विशेष मूल जन्माला आले तर त्याचा सांभाळ कसा करायचा, असा प्रश्न अाई-वडलांसमोर उभा राहताे. अशा मुलांना कुणाच्या सहानुभूतीची नव्हे तर सहकार्याची गरज असते. या मुलांना सक्षम करणाऱ्या शाळा सध्या कोरोनामुळे बंद आहेत. ही अडचण ओळखून मुलांचा मानसिक विकास करण्यासाठी परतवाडा येथील स्व. गेंदीबाई श्रीनिवास अग्रवाल मंतीमंद विद्यालयातील शिक्षकांनी पुढाकार घेतला आहे. ही मुले प्रत्यक्ष आई-वडलांच्या रूपातील शिक्षकांसोबत कृतियुक्त शिक्षणातून स्वावलंबणाचे धडे घेत आहेत.
टाळेबंदीमुळे शाळा बंद झाल्या. सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे वर्ग ऑनलाईन सुरु झाले मात्र विशेष मुले फार वेळ ऑनलाइन अथवा एका ठिकाणी बसून राहू शकत नाहीत. त्यांना गुंतवून ठेवणेदेखील सोपे नाही. मग शाळा बंद असताना त्यांच्या शिक्षणाचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा शिक्षकांच्या मदतीनेच पालकांनीच शिक्षकांची भूमिका बजावावी, या उद्देशाने परतवाडा येथील स्व.गेंदीबाई श्रीनिवास अग्रवाल मंतीमंद विद्यालयातील शिक्षकांनी पालकांचे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केले.
पालकांनी मुलांची घरी कशी काळजी घ्यावी, काेणत्या साहित्याचा वापर करून शिकवावे याचे प्रशिक्षण दिले. परिणामी आता स्वयंपाकघरातील भांडी, कणीक, मोत्यांची माळ, बटाटे, कांदे, भेंडी, अंगणातील फुले-झाडे, आसपास असलेल्या गोष्टीचा वापर मुलांच्या प्रगल्भता वाढवण्यासाठी, त्यांच्यातील व्यवहारज्ञान वाढवण्यासाठी केला जाताेय.
स्व. गेदींबाई श्रीनिवास मतीमंद विद्यालयात सुमारे ५० पेक्षा अधिक जण शिक्षण घेतात. हे सर्वजण शिक्षकांचा पुढाकार व पालकांच्या तालमीत घरूनच ज्ञानार्जन करत अाहेत.
मुलं शहाण्यासारखी वागू लागली
टाळेबंदीमुळे शाळा बंद झाल्या. विशेष विद्यार्थ्यांच्या शिक्षणांवर राज्यभर खल सुरु असताना येथील शिक्षक व पालकांच्या कृतीतून तयार केलेला अभ्यासक्रमात विद्यार्थ्याची रुची वाढतांना दिसत आहे. सभोवतालाच जग व त्यांतील वस्तूंचा उपयोग करुन विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिक्षणामुळे अनेक सकारात्मक बदल दिसून येत आहे. लहान-लहान गोष्टी, गाणी, नृत्यातून विद्यार्थ्यांची दिनचर्चा तयार झाली आहे. यामुळे चिळचिळ कमी होवून होवून मुल शहाण्यासारख वागू लागल्याचे निरीक्षण शिक्षकांनी नोंदविले आहे.
विशेष मुलांना कृतियुक्त शिक्षणातूनच आपण सक्षम करू शकतो. शाळा बंद असल्याने शाळेतील शिक्षकांनी व्हॉट्स अॅप ग्रुप तयार करुन पालकांना ऑनलाइन प्रशिक्षण दिले. शाळेतील शिक्षिक रोज सकाळी स्वावलंबी शिक्षण देणारे विविध व्हिडिओच्या माध्यमातून उपक्रम दाखवतात. ते पाहून पालक मुलांना शिकवतात. अभ्यासच नव्हे तर गाणी, मुलांना डान्स असे एकुण स्वावलंबी व्यक्तीमत्व निर्माणासाठी धडे देण्यात येत आहे.
– अनिल पिहुलकर, मुख्याध्यापक,
स्व. गेंदीबाई श्रीनिवास अग्रवाल मतीमंद विद्यालय, परतवाडा