जितेंद्र कोठारी, वणी : येथील उप विभागीय अधिकारी संजय पुजलवार यांची बदली होऊन त्यांच्या जागी सातारा येथून आलेले गणेश किंद्रे यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. सन 2012-13 बॅचचे अधिकारी असलेले गणेश किंद्रे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे दोन वर्षापासून उपविभागीय पोलिस अधिकारी पदावर कार्यरत होते. सातारा व वाळूज शहर विभागाचा अतिरिक्त पदभार त्यांच्या कडे होता. औरंगाबाद येथे दहशतवाद विरोधी पथकात देखील त्यांनी काम केले आहे. मोक्का सारखे मोठे विषय ही त्यांनी हाताळले आहे.
वणी उपविभागात वणी, मारेगाव, शिरपूर, मुकुटबन व पाटण असे 5 पोलिस स्टेशन आहेत. कोळसा खाणी, नद्या व औद्योगिक क्षेत्र असलेल्या वणी उप विभागात कोळसा चोरी, रेती तस्करी, भंगार चोरी, गोवंश तस्करी, मटका, क्रिकेट सट्टा, गुटखा व सुगंधित तंबाखू, ओव्हरलोड वाहतूकीच्या धंद्यातून अनेक लोक गब्बर झाले आहेत. अनेकदा पोलिसांकडून अवैध व्यावसायिकांवर कारवाई केली जाते. मात्र काही दिवसांनी अवैध धंदे पुन्हा सूरू होतात. नवीन अधिकाऱ्यांपुढे अवैध व्यवसायांचा समूळ उच्चाटन करण्याचे सर्वात मोठे आव्हान आहे.
उपविभागातील वणी व शिरपूर हे दोन ठाण्यांची मलाईदार ठाणे म्हणून संपूर्ण जिल्ह्यात ओळख आहे. या दोन्ही पोलिस स्टेशनच्या हद्दीत कोळसा व दगड खाणी, कोल वॉशरीज, कोळसा प्लॉट व ओव्हरलोड वाहतुक मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय मटका व क्रिकेट सट्ट्याचे राज्यातील प्रमुख केंद्र म्हणून वणी शहराचे नाव दूरवर पसरलेले आहे.
मुकुटबन व पाटण पोलीस स्टेशनची हद्द ही तेलंगणा राज्या लगत आहे. या भागातून मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू, गुटख्याची तस्करी होते. याशिवाय जनावर तस्करीच्याही मोठ्या घटना या परिसरात घडत असतात. मारेगाव हे आदिवासी बहुल भागातील ठाणे आहे. या परिसरात अलिकडे मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू आहे.
उप विभागातील 5 पोलिस स्टेशनचे बॉस असलेले नवीन एसडीपीओ गणेश किंद्रे अवैध धंदे व गुन्हेगारी मोडीत काढण्यास कितपत यशस्वी होईल, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
Comments are closed.