निलजईत दांपत्याला जातिवाचक शिवीगाळ, रोजगारावर बहिष्कार

आरोपीचा पदाचा आव आणत त्रास, अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी:  जात, भीती आणि दहशतीची ही कहाणी एका साध्या दांपत्याच्या आयुष्याला हादरा देणारी ठरली आहे. गावात परत येऊन नव्याने जीवन उभारण्याचा त्यांचा प्रयत्नच काहींना सहन झाला नाही, आणि त्यामुळे एक गंभीर अॅट्रॉसिटी प्रकरण उघडकीस आले आहे.

निलजई येथील साधना प्रशांत नगराळे (वय 37) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या आपल्या पतीसह मजुरी करून उपजीविका चालवतात. काही वर्षांपूर्वी गुजरातेत वास्तव्यास असलेले हे दांपत्य, जून महिन्यात निलजई गावात परत आले आणि किरकोळ दुकान सुरू करून उदरनिर्वाह करत होते.

मात्र, गावातील मनोज ऊर्फ मंजु भाऊराव डंभारे (वय 48) याने त्यांना “तुम्ही या गावचे रहिवासी नाही, येथे राहू नका” असे म्हणत सतत त्रास दिला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

30 ऑगस्ट रोजी ग्रामसभेनंतर आरोपी डंभारे याने साधना नगराळे व त्यांच्या पतीला घरासमोर उभे राहून जातिवाचक शिवीगाळ केली आणि “साले… तुम्ही गावात कसे राहता?” अशा अपमानास्पद शब्दांत धमक्या दिल्या. भीतीपोटी त्या दांपत्यानं त्यावेळी पोलिसांत तक्रार दाखल केली नाही.

यानंतर 26 सप्टेंबर रोजी दोघे रोजगारासाठी निलजईलगत जीआरएन कंपनीत गेले असता आरोपी तेथे हजर झाला. त्याने कंपनी अधिकाऱ्यांना “या व्यक्तींना कामावर घेतले तर कंपनी बंद पाडीन” अशी धमकी देऊन त्यांचा रोजगार रोखला.

या प्रकारामुळे नगराळे दांपत्य उपजीविकेच्या संकटात सापडले असून, आरोपीमुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. शिरपूर पोलिसांनी मनोज ऊर्फ मंजु डंभारे याच्याविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार (अॅट्रॉसिटी) कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे करीत आहेत.

Comments are closed.