जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा
ज्येष्ठ नागरिक मंडळात सन्मान व मार्गदर्शनपर कार्यक्रम
पुरुषोत्तम नवघरे, वणी: ज्येष्ठ नागरिक मंडळ वणीच्या वतीने 1 ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून विरंगुळा केंद्र येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मंडळाचे अध्यक्ष अरुणराव कावडकर यांनी भूषवले. मुख्य अतिथी म्हणून डॉ. राणानुर सिद्दीकी, सेवानिवृत्त गट विकास अधिकारी आनंदराव मुत्यलवार आणि शाखा व्यवस्थापक ए. यू. स्मॉल फायनान्स बँक श्रीधर कुलकर्णी उपस्थित होते.
स्नेहलता चुंबळे यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाची सुरुवात भावपूर्ण वातावरणात झाली. त्यानंतर डॉ. राणानुर सिद्दीकी, आनंदराव मुत्यलवार आणि श्रीधर कुलकर्णी यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कारावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे मन:पूर्वक स्वागत केले.
अध्यक्षीय भाषणात अरुणराव कावडकर यांनी ज्येष्ठ नागरिकांना समाजाचे खरे मार्गदर्शक व आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी भविष्यातील मंडळाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच “ज्येष्ठांनी आयुष्य हसतमुखाने व्यतीत करून आपल्या अनुभवाचा उपयोग पुढील पिढीला करावा” असे आवाहन केले.
डॉ. राणानुर सिद्दीकी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव हे समाजासाठी अमूल्य ठेवा असल्याचे सांगितले. तर आनंदराव मुत्यलवार यांनी ग्रामीण भागातील समाजकार्याचा संदर्भ देत ज्येष्ठ नागरिकांच्या सक्रिय सहभागाची गरज व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक सोनटक्के यांनी केले. सूत्रसंचालन ईश्वर परसावार यांनी उत्साहपूर्ण केले, तर आभार प्रदर्शन राजेंद्र शर्मा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मधुकरराव उपाध्ये, बापुजी वाढई, अनिल कांबळे, गजाननराव देठे, उत्तमराव घोटकर, विनय कोंडावार आणि बुच्चे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक, त्यांचे परिवार व स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला.


Comments are closed.