जब्बार चीनी, वणी: वणीतील आंबेडकर चौक जवळ असलेल्या कल्याण मंडपम या नगर पालिकेच्या सभागृहात गाजावाजा करत 100 खाटांचे विलगीकरण (आयसोलेशन) केंद्र सुरू करण्यात आले. या संकल्पनेच्या प्रसिद्धीबाबत कोणतीही मीडियाबाजी कऱण्याच्या नियोजनात कोणतीही कसूर ठेवण्यात आली नाही. मात्र इथे रुग्णच नसल्याने हे केंद्रच सध्या ‘विलगीकरणात’ गेले आहे.
एप्रिल महिन्यात कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये तालुक्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले. परिणामी आरोग्य सेवा अपुरी पडू लागली. तसेच येणारा काळ हा कोरोनाबाबत आणखी बिकट असल्याचे लक्षात घेऊन नगराध्यक्षांनी 100 खाटांच्या विलगीकरणाची संकल्पना मांडली. दिनांक 20 मार्च रोजी याबाबत नगरपालिकेच्या सदस्यांशी ऑनलाईन (व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा) सर्वसाधारण बैठक घेण्यात आली. या बैठकीत या संकल्पनेला मान्यता देण्यात आली. आवश्यक त्या वस्तू खरेदी करण्याचाही ठराव झाला.
विलगीकरण केंद्रासाठी तीन महिन्याच्या मानधन तत्वावर 4 डॉक्टर, 6 नर्स, 4 वॉर्डबॉय, 4 सेक्युरिटी गार्ड, रुग्णवाहिका चालक, तसेच वैद्यकीय तसेच इतर कामासाठी लागणारे कर्मचारी नियक्त करावे असे देखील या बैठकीत ठरले. तसेच दानशुरांकडून रुग्णांसाठी भोजन सेवा, रुग्णवाहिका व इतर काही सेवा घेण्याचे ठरले. मात्र 100 खाटांचा गाजावाजा केल्यानंतरही इथे केवळ 60 खाटांचेच विलगीकरण केंद्र तयार करण्यात आले. दिनांक 15 मे रोजी या विलगीकरण केंद्राचे माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी शहरातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.
सध्या वणी शहरात विलगीकरण केंद्राची अत्यंत गरज आहे. हे केंद्र सुरू जरी झाले असले तरी ते योग्य प्रकारे चालण्यासाठी अनेक तांत्रिक बाबींची पूर्तता करणे गरजेचे आहे. यात महत्त्वाचे म्हणजे नगरपालिकेला कोणतेही डॉक्टर किंवा नर्स अपॉइंट करण्याची परवनगी नाही. तिथे कोणत्याही रुग्णाला स्वत:हून भरती होता येत नाही. तिथे कोणता रुग्ण ठेवायचा याचे अधिकार केवळ आरोग्य विभागाला आहे. शिवाय बरे झालेले रुग्णांना आयसोलेट करण्यासाठी याचा वापर करावा असे सांगण्यात आल्याने बरे झाल्यावर इथे जाऊन पुन्हा आयसोलेट होण्याची कोणत्याही रुग्णाची मनस्थिती नसते.
तांत्रिक अडचणीमुळे केंद्र सुरू होण्यास विलंब: तारेंद्र बोर्डे
हे विलगीकरण केंद्र भविष्यातील खबरदारी म्हणून तयार करण्यात आले आहे. आम्ही रुग्णांसाठी सर्व सोयी सुविधा तिथे दिल्यात. तिथे डॉक्टरांची ड्युटी देखील लावण्यात आली आहे. विलगीकरण केंद्र जरी तयार झाले तरी काही तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात 8 दिवसांचा वेळ गेला. दरम्यान कोरोनाचे रुग्ण कमी होत आहे. त्यामुळे तिथे रुग्ण नाही, पण काही दिवसात तिथे रुग्ण पाठवणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
– तारेंद्र बोर्डे, नगराध्यक्ष वणी
सध्या ट्रामा सेंटर व परसोडा येथे विलगीकरण केंद्र आहे. ट्रामा केअर मध्ये सध्या सुमारे 50 रुग्ण आहेत. तर परसोडा येथे 10 ते 15 रुग्ण आहेत. याशिवाय अधिकाधिक रुग्ण हे विलगीकरण केंद्रात राहण्यापेक्षा तिथल्या अपु-या सोयी सुविधेमुळे होम आयसोलेशनचा पर्याय निवडतात. नगर पालिकेच्या विलगीकरण केंद्राचा बरे झालेल्या रुग्णांना आयसोलेट करण्यासाठी करावा असा आदेश असल्याची माहिती आहे. मात्र बरे झालेले रुग्ण पुन्हा भरती होण्यापेक्षा होम आयसोलेट किंवा होम कॉरन्टाईन राहण्यास पसंती देत आहे.
परसोडा येथील कोविड केअर सेंटर बंद करून तिथले रुग्ण नगर पालिकेच्या आयसोलेशन केंद्रात पाठवण्याचे विचाराधीन असल्याची सूत्रांची माहिती आहे. परसोडा येथील कोविड केअर सेंटर हे गावाबाहेर असल्याने रुग्णांची काही प्रमाणात गैरसोय होते. जर शहरात विलगीकरण केंद्र सुरू झाल्यास ते रुग्णांच्या सोयीचे होईल. याशिवाय घरगुती टिफिन सारखी सेवा देखील रुग्णांना मिळू शकते. आता जरी याचा फायदा नसेल तरी भविष्यात मात्र होऊ शकतो असे मत काही डॉक्टरांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा:
लॉकडाऊमध्ये मागल्या दारातून कपडे खरेदीची ‘सुविधा’ देणा-या दुकानावर धाड