‘आमदारांच्या अनास्थेमुळे वणीत उपजिल्हा रुग्णालय नाही’
मनसेचे राजू उंबरकर यांचा पत्रकार परिषदेत आरोप
जब्बार चीनी, वणी: वणीसाठी उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले. मात्र आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या अनास्थेमुळे वणीत उपजिल्हा रुग्णालय झाले नाही असा आरोप मनसेचे राजू उंबरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. याशिवाय कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ग्रामीण रुग्णालयातील ट्रामा सेंटर येथे तात्काळ कोविड सेंटर सुरू करावे अशी मागणीही त्यांनी केली.
2013 मध्ये महाराष्ट्र शासनच्या आरोग्य विभागाने वणी 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयात अपग्रेड करावे असा आदेश काढला होता. मात्र आमदारांनी हे प्रकरण दपडत यात कोणताही पाठपुरावा न केला. त्यामुळे वणीत उपजिल्हा रुग्णालय झाले नाही असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
वणी ग्रामीण रुगणालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा या करीता महाराष्ट्र नव निर्माण सेनेने सातत्याने पाठपुरावा केला. मनसेचे तत्कालिन आमदार दिवंगत रमेश वांजळे यांनी तत्कालीन आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांच्या माध्यमातून सन 2001 च्या लोकसंख्येवर आधारीत राज्यात आरोग्य संस्था स्थापनेचा बृहत आराखडा तयार करण्यात आला होता. यात सार्वजनिक आरोग्य विभगाने वणी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला. असेही राजू उंबरकर म्हणाले.
सन 2014 पासुन आ. संजीवरेड्डी बोदकुरवार मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहे. शासन निर्ण्य काय आहे, त्याची व्याप्ती किती असते, नागरिकांच्या जीवन मरणाचा प्रश्न, कोरोना महामारीचे सावट, कोविड सेंटरची दुर्दशा, आरोग्य विषयक सोयी सुविधेचा अभाव. इत्यादी गंभीर प्रश्नांकडे आमदारांचे लक्ष नसते. असा ही आरोप करण्यात आला.
ट्रामा सेंटरमध्ये कोविड सेंटर करा
वणी परिसरात कोरोना बाधीत रूग्णांची संख्या झपाट्यानो वाढत आहे . निष्पाप नागरीक मरत आहेत. त्यामुळे वणी ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरु करावे तसेच तात्काळ उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा अशी मागणीही राजू उंबऱकर यांनी केली. विशेष म्हणजे यवतमाळ जिल्हयामध्ये तीन उपजिल्हा रुग्णालय आहे आणि तिथे कोविड सेंटर सुरु झाले आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय असेही ते म्हणाले.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)