वेल्हाळा नावाला विरोध: लाठी गावाला मिळावी गटाची ओळख !
अस्तित्वात नसलेल्या गावाचे सर्कलला नाव, अॅड. राहुल खारकर यांची मागणी
बहुगुणी डेस्क, वणी: नुकतेच प्रशासनाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट व गणांची पुनर्रचना जाहीर केली आहे. यात लाठी-लालगुडा सर्कलला ‘वेल्हाळा’ असे नाव देण्यात आले आहे. परंतु, वेल्हाळा हे गाव प्रत्यक्षात अस्तित्वात नसून केवळ महसूल नोंदीतील एक शिव आहे. या ठिकाणी कोणतेही मतदान केंद्र किंवा ग्रामपंचायत नाही. याबाबत लाठी ग्रामपंचायतचे सदस्य अॅड. राहुल खारकर यांनी प्रशासनाला निवेदन सादर करून वेल्हाळा ऐवजी लाठी गावाचे नाव देण्याची मागणी केली आहे.
लाठी ग्रामपंचायत ही या सर्कलमधील सर्वाधिक लोकसंख्या आणि मतदारसंख्या असलेली ग्रामपंचायत आहे. येथे शाळा, अंगणवाडी, क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालय, शासकीय सुविधा आणि विविध संस्था कार्यरत आहेत. यापूर्वीही या सर्कलचे नाव ‘लाठी-लाडगुडा’ असे होते, जे स्थानिक स्तरावर रूढ होते. वेल्हाळा हे केवळ महसूल नोंदीतील नाव असून, प्रत्यक्षात ग्रामस्थांचा सहभाग आणि लोकशाही प्रक्रिया लाठी गावातूनच घडते.
त्यामुळे, प्रशासनाने वेल्हाळा हे नाव रद्द करून लाठी हे नाव गट/गणासाठी कायम करावे, अशी आग्रही मागणी अॅड. राहुल खारकर यांनी निवेदनातून केली आहे. ही मागणी स्थानिक लोकसंख्या, सुविधा आणि पारंपरिक संदर्भ लक्षात घेता योग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.



Comments are closed.