विद्युत खांब स्थलांतरणाच्या कामात अतिक्रमणाचा अडथळा

सर्व्हिस रोडवर व्यापाऱ्यांचे अतिक्रमण, नालीच्या पलीकडे खांब लावण्याचे आमदारांचे आदेश,

जितेंद्र कोठारी, वणी: चिखलगाव रेल्वे गेट ते साई मंदिर चौकापर्यंत सुरु असलेल्या सिमेंटरोडच्या मधोमध येणारे विद्युत खांब स्थलांतरित करण्याचे कार्य पुन्हा रखडले आहे. सिमेंट रस्त्याला लागून असलेल्या सर्व्हिस रोडवर काही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले आहे. त्यामुळे वीज वाहिनी टाकण्यास अडथळा निर्माण झाला आहे.

वाहतुकीस बाधा उत्पन्न करणारे वीज खांब व धोकादायक वीजवाहिनी शिफ्टिंग करण्याचे काम नागपूर येथील ए.एन.के. पावरटेक कंपनीला देण्यात आले आहे. कंपनीतर्फे वणी येथील बिलोरिया इंटरप्राइसेस या कंत्राटदारानी 27 जानेवारी पासून सिमेंट रस्त्याच्या बाजूला नवीन पोल उभ्या करण्याचा कामाला सुरुवात करण्यात आली.

सदर सिमेंट रस्त्याला लागून 15 ते 20 फुटाचा ले आऊट सर्व्हिस रोड आहे. परंतु सर्व्हिस रस्त्यावर व्यापाऱ्यांनी अनाधिकृतरित्या अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले. त्यामुळे कंत्राटदारांनी सिमेंट रस्त्याला लागून नव्याने बसविण्यात आलेले पेव्हर ब्लॉक खोदून त्याठिकाणी पोल उभे केले.

चुकीच्या ठिकाणी विद्युत खांब उभारण्यात येत असलेबाबत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार याना माहिती मिळाली. तेव्हा स्वतः आमदारांनी कामाच्या ठिकाणी जाऊन खांब उभारणीचे काम बंद करण्याचे आदेश दिले. आमदारांनी सिमेंट नालीच्या पलीकडे वीज खांब व डीपी लावण्याचे निर्देश संबंधित कंत्राटदाराला दिले. तसेच बांधकाम विभागाला सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. त्यामुळे कंत्राटदारांनी तात्पुरते वीज खांब हटविण्याच्या कामाला ब्रेक लावले आहे.

विद्युत लाईन शिफ्ट करण्याचे आदेश – आमदार
कोट्यवधींच्या निधीतून नव्याने बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याला खोदून वीज खांब लावण्याचे कार्य वीज कंत्राटदाराकडून सुरू होते. भविष्यात रस्ता रुंदीकरण करताना पुन्हा अडथळा होऊ नये. तसेच रस्त्याला लागून वीज वाहिनी टाकल्यास वाहतुकीलासुद्दा धोका होईल. त्यामुळे योग्य ठिकाणी विद्युत लाईन शिफ्ट करण्याची सूचना संबंधित विभागांना देण्यात आली आहे.
– संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार, वणी विधानसभा

हे देखील वाचा:

ऑटो चालकाची पेट्रोलने जाळून घेऊन आत्महत्या

अवैध धंद्यावरील धाड प्रकरणी 23 पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई

Comments are closed.