वणीत सोशल मीडियावर मु्ख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह पोस्ट

आक्षेपार्ह टीका करणे आले अंगलट, दोघांवर गुन्हा दाखल

0

विवेक तोटेवार, वणी: सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणे वणीतील दोघांना चांगलेच भोवले आहे. एकाने वॉट्सऍपवर तर दुस-याने फेसबूकवर मुख्यमंत्री यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. यावर शिवसैनिक संतप्त झाले व त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

सरकार समर्थक आणि सरकार विरोधक असा सोशल मीडियावर सामना काही नवीन नाही, वणीतही हा सामना फेसबुक व व्हॉटसअपवर चांगलाच रंगतो. मात्र काल रविवारी वणीत हा सामना मात्र टोकाला गेल्याचे दिसून आले. वणी येथील वणी ग्राम समाचार या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर सतीश पिंपरे (55) राहणार नांदेपेरा रोड वणी यांनी नांदेड येथे झालेल्या साधुच्या हत्येविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार व राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह फोटो शेअर केला. हा फोटो येताच शिवसैनिक संतप्त झाले. त्यांनी लगेच फोटो डिलिट करण्याची विनंती केली होती.

तर व्यावसायिक विवेक पांडे (35) राहणार गांधी चौक वणी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार व सोनिया गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली. यामुळे शिवसैनिक चांगलेच संतापले. त्यांनी या दोन्ही आक्षेपार्ह पोस्टविषयी पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार केली. पोलिसांनी भादंविच्या कलम 501 व 504 नुसार या दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे.

यावेळी तालुका प्रमुख रवी बोढेकर यांच्यासह शहरप्रमुख राजू तुरणकार, युवासेना जिल्हाध्यक्ष विक्रांत चचडा, महेश चौधरी, नरेंद्र ताजने, ललीत लांजेवार, ऍड. अमोल बोरूले, प्रशांत बलकी, बंटी येरणे, अजिंक्‍य शेंडे, आदेश कोंगरे उपस्थित होते.

पातळी सोडून केलेली टीका खपवून घेणार नाही – विश्वास नांदेकर
टीका करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. मात्र ही टीका पातळी सोडून व्हायला नको. मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य किंवा पोस्ट खपवून घेतली जाणार नाही. दोषींवर योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे. यापुढेही कुणी अशी आक्षेपार्ह टीका केल्यास शिवसेना गप्प बसणार नाही.
– विश्वास नांदेकर जिल्हाप्रमुख शिवसेना

Leave A Reply

Your email address will not be published.