आमदार गायकवाड व खासदार बोन्डे यांना तात्काळ अटक करा

राहुल गांधी यांच्याविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्याचा काँग्रेसतर्फे निषेध

विवेक तोटेवार, वणी: राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांची जीभ घसरली. यावरुन आता काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजप खासदार अनिल बोंडे यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा, अशी मागणी वणी शहर व तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे. याबाबत गुरुवारी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दोघांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत या वक्तव्याचा निषेध केला.

शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी “काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला अकरा लाख रुपयांचे बक्षीस देऊ” असे बेताल आणि वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यातच पुन्हा भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी “राहुल गांधी यांची जीभ नका छाटू तर जिभेला चटके द्या” असे आक्षेपार्ह वक्तव्य करुन नव्या वादाला तोंड फोडले.

वाचाळवीर आमदार संजय गायकवाड व खासदार अनिल बोंडे यांनी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे दोघांवरती तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करा. अशी मागणी वणी तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आली.

निवेदन देते वेळी तालुक्याचे काँग्रेस कमिटी अध्यक्ष घनश्याम पावडे व वणी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र लोढा यांच्या उपस्थितीत प्रा. टिकाराम कोंगरे, रवी देठे, डॉ. मोरेश्वर पावडे, ओम ठाकूर, आशिष खुलसंगे, मंगल मडावी, सुरेश काकडे, विवेक जी मांडवकर, राजू कासावार, प्र. शा. उपरे, अशोक पांडे, आर. बी. कोरडे, सुधीर खंडाळकर यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.