वरोरा रोडवर दुचाकीने वृद्धास उडवले, वृ्द्धाचा मृत्यू

मंदिरात दर्शनासाठी जाताना नागोराव आवारी यांचे अपघाती निधन

विवेक तोटेवार, वणी: वणीतील प्रतिष्ठित व ज्येष्ठ नागरिक व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते नागोराव आवारी (72) यांचे बुधवारी सकाळी अपघाती निधन झाले. वरोरा रोडवरील जगन्नाथ महाराज मंदिर देवस्थानात जाताना त्यांना एका दुचाकीने उडवले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. आज गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

नागोराव आवारी हे देशमुखवाडी रोड नाना नानी पार्क जवळ राहत होते. ते नेहमी वणीतील वरोरा रोडवरील जगन्नाथ महाराज मंदिरात दर्शनासाठी जायचे. बुधवारी दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी ते मंदिरात जात होते. दरम्यान 11 वाजताच्या सुमारास वरोरा रोडवरील वळणावर एका दुचाकीने त्यांना धडक दिली. या धडकेत ते जखमी झाले. घटनास्थळी असलेल्या लोकांनी त्यांना वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

नागोराव आवारी त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, जावई, नातवंड असा फार मोठा आप्तपरिवार आहे. ते लोटी महाविद्यालयातील प्राध्यापक विकास जुनगरी यांचे सासरे होते. ते शेतकरी संघटना व ज्येष्ठ नागरिक मंडळाचे देखील सदस्य होते. त्यांच्या अपघाती निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी धडक देणा-या दुचाकी चालकाविरोधात गु्न्हा दाखल केला आहे.

Comments are closed.