वणीत रोजगार सेवकांचे एक दिवशीय उपोषण

वंचितने दिला पाठिंबा तर आमदारांनी घेतली आंदोलकांची भेट

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ग्राम रोजगार सेवकांना शासकीय सेवेत समाविष्ठ करावे, त्यांची शासकीय मानधनावर नियुक्ती करावी इत्यादी मागणीसाठी वणी तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांनी आज तहसील कार्यालयासमोर एक दिवशीय उपोषण केले. सकाळी 11 वाजता त्यांच्या आंदोलनाला सुरूवात झाली. दुपारी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळी भेट देत रोजगार सेवकांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. तर आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी देखील उपोषण मंडपात येऊन आंदोलकांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करणार असे आश्वासन दिले.

सन 2005 पासुन महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना राज्यात अमलात आणली गेली. या योजनेचे काम हाताळण्यासाठी प्रत्येक ग्राम पंचायत स्तरावर ग्राम सभेच्या माध्यमातून ग्राम रोजगार सेवकाची नियुक्ती करण्यात आली. ही कामे ग्राम रोजगार सेवक तत्परतेने हाताळत आहे. मात्र या कामाच्या मोबदल्यात या रोजगार सेवकांना अत्यल्प मानधन दिले जात आहे.

ही वेतन प्रणाली बंद करून ग्राम रोजगार सेवकांची शासकीय मानधनावर नियुक्ती करावी, रोजगार सेवकांना शासकीय सेवेत समाविष्ठ करावे, प्रवास भत्ता द्यावा इत्यादी मागणीसाठी आज गांधी जयंतीच्या दिवशी राज्यभरातील रोजगार सेवकांनी एक दिवशीय उपोषणाचे राज्यव्यापी आंदोलन सुरु केले. वणी तालुक्यात देखील हे आंदोलन करण्यात आले. या उपोषणात तालुक्यातील सर्व रोजगार सेवकांनी भाग घेतला. याबाबत उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित करण्याचे आश्वासन दिले.
वंचित आघाडीने भेट घेत आंदोलकांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर केला.

हे देखील वाचा:

गोडगाव शिवारात वाघाचा गायीवर हल्ला, गाय ठार

लिंगटी येथे शेतात बापलेकांवर कोसळली वीज, एकाचा मृत्यू

Comments are closed.