विवेक तोटेवार, वणी: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या राज्यात लॉकडाऊन आहे. सध्या कामधंदे बंद असल्याने अनेकांचा रोजगार गेला आहे. रोजगार गेल्याने अनेकांची आर्थिक स्थिती खराब झाली आहे. त्यामुळे सध्या मद्यपी दारुऐवजी सॅनिटायझरचं सेवन करत असल्याच्या अनेक घटना राज्यात पुढे येत आहे. वणीत देखील दारु न मिळाल्याने अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझर पिल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
सदर तरुण वणीतील रंगारीपु-यातील रहिवाशी असून तो एका पानटपरीवर काम करायचा. पण सध्या पानटपरी बंद असल्याने त्याची आर्थिक परिस्थिती खराब होती. त्यातच त्याला मद्य सेवन करण्याचीही सवय असल्याचे कळते. मंगळवारी दिनांक 12 मे रोजी त्याने नशा करण्यासाठी सॅनिटायझर खरेदी केले. मात्र सॅनिटायझर पिल्यानंतर काही काळानंतर त्याची प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला त्याच्या मित्रमंडळींनी तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला तातडीने चंद्रपूरला दाखल करण्यास सांगितले.
त्याला चंद्रपूरला नेले असता त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. अखेर गुरुवारी 14 मे रोजी त्याची प्राणज्योत मालवली. तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या आधीही राज्यात अनेकांनी सॅनिटायझर पिल्याने यातील काहींना जीव गमवावा लागला आहे.