गंडा..! ऑनलाईन कपडा खरेदी पडली महागात

सुंदरनगर येथील शिक्षिकेच्या बँक खात्यातून 2.5 लाख उडविले

जितेंद्र कोठारी, वणी: वेबसाईटवरुन ऑनलाईन कपडे खरेदी करून परत करणे एका शिक्षिकेला चांगलेच महागात पडले. रिफंडच्या नावावर शिक्षिकेच्या बँक खात्यातून अज्ञात भामट्यानी 3 दिवसात तब्बल अडीच लाख रुपयांची रक्कम लंपास केली. लाखोंची ऑनलाईन फसवणूक झाल्याबाबत सुंदरनगर येथील शिक्षिकेनं शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. विद्या राजेंद्र डेरे असे तक्रारदार शिक्षिकेचे नाव आहे. सुंदरनगर येथील नामांकित डीएव्ही पब्लिक स्कुलमध्ये त्या अध्यापन कार्य करतात.

पीडित शिक्षिकेनीं इकार्ट नावाच्या वेबसाईटवरून स्वतःसाठी कपड्यांची ऑनलाईन ऑर्डर केली होती. 18 डिसेंम्बर 2021 रोजी त्यांनी केलेल्या ऑर्डरची पार्सल घरी पोहचली. मात्र पार्सल खोलून बघितले असता त्यात ऑर्डरप्रमाणे कपडे नव्हते. तेव्हा शिक्षिका विद्या डेरे हिने वेबसाईटच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करून ऑर्डरप्रमाणे कपडे नसल्याची तक्रार केली. थोड्यावेळाने एका अनोळखी मोबाईल क्रमांक वरुन विद्या डेरे याना फोन आला. बँक खात्यात पैसे रिफंड करायचे आहे म्हणून मोबाईलमध्ये एनीडेस्क ऍप्लिकेशन डाउनलोड करण्याची सूचना फोन करणाऱ्या इस्मानी केली.

एनीडेस्क डाउनलोड केल्यानंतर समोरील व्यक्तीच्या निर्देशानुसार डेरे यांनी फोन पे क्यूआर कोड, यूपीआय आयडी व ओटीपी त्याला सांगितले. त्यानंतर डेरे याना मोबाईल मधून एनीडेस्क सॉफ्टवेअर व फोन पे डिलीट करण्याचे सांगण्यात आले.

दि. 20 डिसेंम्बर रोजी सायंकाळी विद्या डेरे यांच्या स्टेट बँक खात्यातून 49 हजार 500 रुपये डेबिट झाल्याचा मेसेज मोबाईलवर आला. त्यानंतर 22 डिसेंम्बर रोजी त्यांच्या मोबाईलवर पुन्हा 40 हजार रुपये खात्यातून ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आला. शिक्षिका डेरे हिने बँक खात्यातून पैसे गेल्याबाबत तब्बल 3 दिवसानंतर पती राजेंद्र डेरे याना सांगितले. राजेंद्र डेरे यांनी वणी येथील भारतीय स्टेट बँक शाखेत जाऊन चौकशी केली असता विद्या राजेंद्र डेरे हिच्या बँक खात्यातून 19 डिसेंम्बर ते 22 डिसेंम्बर दरम्यान 2 लाख 49 हजार 14 रुपये काढण्यात आल्याची माहिती दिली.

ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित शिक्षिका हिने पती राजेंद्र सोबत 25 डिसें. रोजी शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली. शिरपूर पोलिसांनी ऑनलाईन फसवणूक बाबत तात्काळ सायबर सेलकडे माहिती पाठविली. तसेच 3 जानेवारी रोजी अज्ञात व्यक्ती विरुद्द कलम 420अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि गजानन करेवाड स्वतः करीत आहे.

ऑनलाईन खरेदी करताना सावधानी बाळगा: ठाणेदार
ऑनलाईन वस्तू खरेदी करताना अनोळखी वेबसाईटवरून खरेदी करणे टाळावे. कोणत्याही व्यक्तीला आपले फोनपे, गूगल पे क्यूआर कोड, यूपीआय आयडी, एटीएम कार्डवरील नंबर, सिव्हीवही, ओटीपी, पासवर्ड सांगू नये. एनीडेस्क सारखे कोणतेही ऍप्लिकेशन डाउनलोड करू नये. बँकेतून पैसे काढल्याची माहिती मिळताच तात्काळ बँकेशी संपर्क करा.
:गजानन करेवाड, सहा.पो. निरीक्षक, शिरपूर

ओटीटी शेअर करू नका तसेच अ‍ॅप डाऊनलोड करू नका

हव्या त्या वस्तू सवलतीमध्ये घरबसल्या मिळत असल्यामुळे ऑनलाइन खरेदीकडे नागिरकांचा कल वाढला आहे. ऑनलाइन खरेदी-विक्री करणाऱ्या कंपन्यांची संख्याही वाढली आहे. कपड्यापासून ते कॉस्मेटिक्सपर्यंत आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू, किराणा मालपासून ते क्रीडा साहित्यापर्यंत वस्तू ऑनलाइन मिळतात. मात्र, या ऑनलाइन व्यवहारांमध्ये फसवणुकीचे प्रकारदेखील समोर येऊ लागले आहेत. सर्व बँकांकडून आपल्या खातेदारांना वारंवार सूचना देण्यात येते की, कोणतीही बँक खातेदारांकडून नेट बँकिंग पासवर्ड, एटीएम पिन, कार्ड नंबर आणि ओटीपी मागत नाही. त्यामुळे जर कोणी आपणाकडून बँक खात्याबद्दल माहिती मागत असेल तर कोणतीही माहिती देऊ नये.

 

Comments are closed.