विवेक तोटेवार, वणी: फास्ट टॅगमधून कटलेल्या 115 रुपयांच्या टोलची रक्कम परत मिळवणे वणीतील एका कार मालकाला चांगलेच महागात पडले. एका अज्ञात भामट्याने लिंक पाठवून व ओटीपी विचारून त्यांना तब्बल 27 हजारांची टोपी टाकली. ओटीपी कधीही कुणाजवळ शेअर करायचा नसतो. हे माहिती असूनही परिसरातील अनेक लोक याला बळी पडत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सावधगिरी बाळगळे गरजेचे आहे.
सविस्तर वृत्त असे की समी अली शरफ अली (42) हे शहरातील टिळक चौक परिसरात राहत असून ते कोर्टात काम करतात. त्यांच्याकडे एर्टिगा ही कार (MH49 BB7861) आहे. दिनांक 4 ऑक्टोबर रोजी त्यांचा एक मित्र त्यांची कार घेऊन नागपूरला गेला होता. नागपूरला जाताना बुटीबोरी आधी बोरखेडी टोल प्लाझावर 3 वाजताच्या सुमारास त्यांच्या फास्ट टॅगमधून 145 रुपयांचा टोल कटला तर रात्री सव्वा 7 वाजताच्या सुमारास वणीला परतताना 70 रुपये टोल कटला. याचे त्यांना मॅसेज आले. 19.50 मिनिटांनी त्यांना आरंभा टोल नाक्याचे 115 रुपये कटल्याचा मॅसेज आला.
रात्री त्यांचा मित्र कार घेऊन परत आला असता त्यांनी आरंभा टोलनाक्यावर टोल कटण्याबाबत विचारणा केली. मात्र त्यांनी केवळ बुटीबोरीजवळ असलेल्या बोरखेडी येथील टोल कटला व वरोरा येथे टोल लागला नाही याची माहिती दिली. मात्र मॅसेज आल्याने समी यांनी गुगलवर आरंभा टोल प्लाजा सर्च केला असता त्यांना त्यावर कस्टमर केअर म्हणून एक नंबर दिसला. त्यांनी त्यावर कॉल केला असता सदर नंबर बंद होता. मात्र समी यांनी दुस-या दिवशी पुन्हा आरभा टोल प्लाझाच्या नंबरवर कॉल केला. यावेळी सदर नंबर लागला. त्या नंबरवर विचारणा केली असता त्यांनी चुकीने टोल कटला असल्याची माहिती देत सदर पैसे परत करण्याचे हमी दिली.
स्कॅमरने त्यांना एक लिंक पाठवत असल्याचे सांगत त्यात गाडीची सर्व डिटेल भरण्यास सांगितले. इथूनच समी यांची फसवणूक सुरू होण्यास सुरुवात झाली. ते स्कॅमरच्या जाळ्यात पुरते अडकेल होते. स्कॅमरने दिलेल्या लिंकवर क्लिक करून समी यांनी आपली संपूर्ण माहिती भरली. त्यानंतर त्यांच्या वॉट्सअपवर काही मॅसेज आले. स्कॅमरने समी यांना ओटीपी विचारला. तो समी यांनी सांगितला. त्यानंतर त्यांच्या खात्यातून 3 हजार प्रमाणे 9 वेळा व्यवहार झाले व त्यांच्या खात्यातून 27 हजार रुपये स्कॅमरने हडप केले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच समी यांनी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार नोंदवली. बुधवारी दिनांक 11 ऑक्टोबर रोजी या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास ठाणेदार अजीत जाधव यांच्या मार्गदर्शनात पीएसआय दत्ता पेंडकर करीत आहे.
ओटीपी कुणालाही सांगायचा नसतो !
सर्वसामान्यांची ऑनलाईन फुसवणूक करण्यासाठी विविध पद्धतीचा वापर केला जातो. फास्ट टॅग ही नवीन पद्धत आहे. यात कार मालकाला पैसे कटल्याचा फेक मॅसेज पाठवला जातो. जवळपास सर्व ऑनलाईन फ्रॉडमध्ये लिंक पाठवून, ओटीपी विचारून किंवा दोन्ही पद्धतीने गंडवले जाते. त्यामुळे मॅसेजवर, वॉट्स अपवर आलेल्या लिंकवर क्लिक करू नका. तसेच नेटवरील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. यामुळे तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो. गुगलवर कस्टमर केअरचा नंबर शोधू नका. यातील अधिकाधिक कस्टमर केअर नंबर हे स्कॅमरचे असून कस्टमर केअरचा नंबर फक्त कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊनच काढा.विशेष म्हणजे ओटीपी हा कुणालाही शेअर करायचा नसतो. त्यामुळे आपला ओटीपी शेअर केल्यास तुम्ही 100 टक्के गंडणार. त्यामुळे ओटीपी कधीही शेअर करू नका.
गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात ओटीपी मागून किंवा लिंक शेअर करून गंडवण्याचे अनेक प्रकार घडत आहे. त्यातच आता फास्ट टॅगद्वारा गंडवण्याचा नवीन प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेच आहे. आपला ओटीपी कुणालाही शेअर करू नका, असे आवाहन ठाणेदार अजीत जाधव यांनी केले आहे.
Comments are closed.