महात्मा ज्योतीबा फुले यांची प्रतिमा काढल्याने नागरिक संतप्त
उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन
विवेक तोटेवार, वणी: स्थानिक प्रभाग क्र.7, माळीपुरा येथील मुख्य चौकातील महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे तैलचित्र असलेला लोखंडी बोर्ड होता. कुठलाही आदेश नसताना किंवा पूर्वसूचना न देता नगरपालिकेने तो गुरुवारी काढल्याचा आरोप स्थानिकांनी केला. त्यामुळे वणी नगर पालिकेचे कार्यकारी अधिकारी व नगराध्यक्ष यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी परिसरातील रहिवाश्यांनी केली आहे. तसे निवेदन त्यांनी उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांना दिले.
गुरुवार दि.10/09/20 ला सकाळी 10.00 ते 11.00 च्या दरम्यान माळीपुरा येथील मुख्य चौकातील महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा कुठलाही आदेश नसताना नगर परिषद कर्मचाऱ्यांनी काढून ताब्यात घेतला आणि नेला असे स्थानिकांनी निवेदनात म्हटले आहे. नगरपालिकेच्या कुठल्याही अतिक्रमण हटाव मोहीम नसताना केवळ हेतुपुरस्सररीत्या हे कृत्य केल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. यामुळे यावर कारवाई व्हावी ही स्थानिकांची मागणी आहे.
निवेदनावर माधुरी कोडपे, सरला वसाके, उषा डुकरे, मनीषा गुरनुले, सीमा वाढई, सुनंदा भेंडाळे, सीमा निकोडे, लता मडावी, लता लेनगुरे, नत्थु डुकरे, बंडू कोडापे,गुणवंत गोलर, कृपाशील तेलंग, कुणाल लोणारे, मो. अल्ताफ, पवन खंडाळकर, महेश पिपराडे, हर्षल शेंडे, पवन मोहूर्ले, उमेश लेनगुरे ह्यांच्या सह्या आहेत.