परमडोहच्या चिमुकल्यांचा शाळेवर बहिष्कार

शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान, शिक्षक देण्याची मागणी

0

शिंदोला, (विलास ताजने): वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या परमडोह या गावातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी पटसंख्येच्या तुलनेत शिक्षकांची पदे रिक्त आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. म्हणून शिक्षक देण्याची मागणी करीत चिमुकल्यांनी शिक्षक मिळेपर्यंत शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

परमडोह येथील जि. प. शाळेत १ ते ७ वी पर्यंतचे वर्ग आहे. एकूण पटसंख्या ६६ आहे. चालू शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला झालेल्या पदवीधर विषय शिक्षकांच्या नियुक्ती दरम्यान येथील प्रभारी मुख्याध्यापकांची बदली झाली. तथापि गणित आणि विज्ञान विषयांचे पद रिक्त राहिले होते. सध्या शाळेत तीन शिक्षक कार्यरत होते. मात्र आजारपणामुळे मनोहर पेलने शिक्षक दीर्घ रजेवर गेले. सदर शिक्षक गंभीर आजारी असल्याने तत्काळ शाळेवर रुजू होण्याची शक्यता नाही.

सध्या दोन शिक्षकांवर अध्यापनाची संपूर्ण वर्गाची जबाबदारी आहे. अशावेळी सर्व वर्गाचे शैक्षणिक कार्य नीट होऊ शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा विद्यार्थी व पालकांचा आरोप आहे. त्यामुळे कमीत कमी एक शिक्षक देण्याची मागणी आहे. ११ जानेवारी पासून चिमुरड्यांनी शाळा बंद केली आहे.

ग्रामस्थांनी मुख्याध्यापकांमार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष देविदास राजूरकर, उपसरपंच संदीप थेरे, सदस्य प्रफुल काकडे, सतीश थेरे, गणेश केळझरकर, रवींद्र कोरांगे, पुरुषोत्तम वासेकर, महेंद्र वासेकर आणि असंख्य पालक हजर होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.