शिंदोला: वणी तालुक्यातील परमडोह आणि कोरपना तालुक्यातील सांगोडा या दोन्ही ग्रामस्थांच्या पुढाकाराने पैनगंगा नदीच्या स्थानिक तीरावर ५ डिसेंबरला भव्य यात्रेचे आयोजन केले आहे.
परमडोह आणि सांगोडा हे दोन्ही गावे पैनगंगा नदीच्या तीरावर वसलेली आहे. सदर गावादरम्यान पैनगंगेच्या प्रवाहाची दिशा दक्षिण – उत्तर वाहिनी असल्याने या स्थळाला साधू – संतांकडून महत्व प्राप्त झाले आहे. ह. भ. प. कै. मीननाथ उरकुडे महाराज व कै. धोंडू निखाडे महाराज यांनी यात्रेला प्रारंभ केला. ग्रामस्थांनी नदी किनारी दत्ताच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. आता दरवर्षी ५ डिसेंबरला यात्रा महोत्सव साजरा केला जातो.
याप्रसंगी कोरपना तालुक्यातील नांदाबीवी येथील निःस्वार्थ अस्थीरुग्णसेवा करणारे समाजसेवक तथा डॉ. गिरीधर काळे यांच्या कार्याचा गौरव सन्मानचिन्ह देऊन ग्रामस्थांच्या वतीने केला जाणार आहे. दुपारी बारा वाजता इंजिनिअर पवन दवंडे यांच्या सप्तखंजिरी वादनासह कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तीन वाजता ह. भ. प. बंडू उरकुडे महाराज यांचे किर्तन होणार आहे. कार्यक्रमाची सांगता नारायणबाबा डाखरे महाराज यांच्या हस्ते दहीहंडी व महाप्रसादाने होणार आहे. परिसरातील भाविकभक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याची विनंती परमडोह आणि सांगोडा ग्रामस्थांनी केली आहे