राजाश्रय व राजकारणाचा दारुबंदीला मुख्य अडथळा: ऍड परोमिता गोस्वामी
वणीत 'मिट द प्रेस' कार्यक्रमाचे आयोजन
विवेक तोटेवार, वणी: आज महसुलाचा नावाखाली दारूबंदीला सरकार नकार देते. मात्र आर्थिक गुजरातसारख्या राज्यात दारूबंदी आहे तर तिथे महसूल दारूमुळे मिळतो का? उलट दारू हे महसूल गोळा करण्याचे नाही तर महसूल खर्च करण्याचे माध्यम आहे असे प्रतिपादन दारूबंदी चळवळीच्या कार्यकर्त्या ऍड परोमिता गोस्वामी यांनी केले. प्रेस वेलफेअरच्या वतीने नगर वाचनालय इथे आयोजित ‘मिट द प्रेस’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. रविवारी संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की सरकारने मनातून दारूबंदी केली तर या प्रकारची दारूमुक्ती नक्कीच होते. मात्र दारूबंदीच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारची राजकीय इच्छाशक्तीच नाही. शिवाय दारूला मिळालेला राजाश्रय आणि राजकारण यामुळे दारुबंदी यशस्वी होत नाही. दारूबंदीबाबत महाराष्ट्रातील कायदे अतिशय ढिसाळ आहेत. बिहार राज्यातील सरकार तेथील दारूबंदीचा आढावा दररोज घेते. उलट आपल्याकडे दारूबंदीनंतर वर्षभरात केवळ एकच बैठक घेण्यात येते. शिवाय ज्या ठिकाणी अवैध दारू विक्री होते त्याकडे प्रशासन राजकीय लागेबांधे असल्याने दुर्लक्ष करते असा आरोपही त्यांनी केला.
चंद्रपूर येथील दारूबंदी बंदी झाल्यावर ही तिथे सर्रास दारूविक्री होत आहे यावर विचारले असता त्या म्हणाल्या की. आज जरी चंद्रपुरात दारू मिळत असली तरी ती सर्वत्र उपलब्ध नाही. शिवाय त्याचे दर हे आधीपेक्षा दुप्पट आहे. त्यामुळे इथे दारू पिणा-यांचे प्रमाण कमी झाले आहे. आज ग्रामीण भागात दारुमुळे अनेक संसार उद्धवस्थ झाले. घरातील कमावता माणूस दारूत पैसे खर्च करायचा. मात्र आज दारूबंदीचा चांगला फरक इथे दिसून येत आहे. अनेकांचे पैसे वाचत असल्याने ग्रामीण भागात आठवडी बाजारात महिलांची संख्या अधिकाधिक दिसून येते.
यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीबाबत बोलताना त्या म्हणाल्या की आज स्वामिनी सारखी संघटना महिलांना सोबत घेऊन इथे काम करीत आहे. लाखोंचा मोर्चा इथे काढला जातो. मात्र इतका प्रतिसाद असतानाही सरकार केवळ इच्छाशक्ती नसल्याने इथे दारूबंदी करण्यास टाळाटाळ करीत आहे. राजाश्रय आणि यामागे असलेल्या राजकारणामुळे यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी होत नसल्याची खंत ही त्यांनी व्यक्त केली. सरकारच्या ऑनलाईन दारूविक्रीच्या निर्णयाचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला.
दारूबंदी चळवळीतील कार्यकर्त्या परोमिता गोस्वामी यांना यंदाचा जैताई मातृगौरव पुरस्कार जाहीर झाला. त्यासाठी त्या वणीत आल्या होत्या. त्याआधी वणीतील पत्रकारसंघ प्रेस वेलफेअर असोशिएशनच्या वतीने ‘मिट द प्रेस’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विजय सिद्धेश्वर, अमित राऊत, माधव सरपटवार, गजानन कासावर, देविदास काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र डाबरे यांनी केले तर आभार तुषार अतकरे यांनी मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वणीतील पत्रकार उपस्थित होते.