वणी-घोन्सा-पारवा रस्ता कामात अवैध उत्खनन? मनसेचा गंभीर आरोप
रस्त्याचे काम निकृष्ट, मोहदा व निमनी येथून आणला मुरुम !
बहुगुणी डेस्क, वणी: वणी-घोन्सा-पारवा मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग 314 (SH 314) च्या काम निकृष्ट दर्जाचे होत असून या कामासाठी वापरण्यात येणारा मुरुम अवैध उत्खनन करून आणण्यात येत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी केला आहे. त्यांनी दिनांक 22 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
पारवा-केळापूर-शिबला-घोन्सा-वणी या रोडचे काम सध्या सुरु आहे. झरी व वणी तालुक्यातून पांढरकवडा, घाटंजी तालुक्यात जाण्यासाठी हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र सध्या सुरू असलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, कामासाठी लागणारा मुरुम आणि खडी अवैध मार्गाने काढली जात आहे. निमणी येथील एका शेतात अवैध मुरुम उत्खनन सुरू असल्याचे उंबरकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आढळले.
झरी तहसील कार्यालयाकडून एका ट्रकला एक ब्रासची रॉयल्टी असताना, प्रत्यक्षात पाच ब्रास मुरुम भरून नेला जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. सदर खडी ही मोहदा येथील खाणीतून आणली जात असून, तिथेही अवैध उत्खनन सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. उंबरकर यांनी निमणी आणि मोहदा येथील उत्खननाची ई.टी.एस. मशीनद्वारे मोजणी करून तफावतीनुसार महसूल वसूल करण्याची मागणी केली आहे.
महसूल विभागाच्या नजरेसमोर एवढे खनिज लुटले जात असताना ते निद्रिस्त का आहेत? तक्रारीनंतरही कारवाई होत नाही. जर तातडीने कारवाई झाली नाही, तर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल.
– राजू उंबरकर, नेता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

दोषींवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करावी, रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमावी, अशी मागणीही त्यांनी केली. जर आठ दिवसांत कारवाई झाली नाही, तर मनसेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.





Comments are closed.