नवरात्रौत्सवात शांतता राखण्यासाठी वणी पोलिसांचा रूट मार्च

कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त

विवेक तोटेवार, वणी: नवरात्रौत्सवाला सोमवार, 22 सप्टेंबर 2025 पासून सुरुवात झाली आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वणी शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वणी पोलिसांनी रूट मार्च काढला आणि नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले.

नवरात्रौत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी वणी पोलिसांनी घटस्थापनेच्या दिवशी, 22 सप्टेंबर रोजी शहरात रूट मार्च आयोजित केला. उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे आणि पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च यशस्वीपणे पार पडला.

या रूट मार्चमध्ये वाहतूक शाखेचे सपोनि महाले, पोलीस स्टेशन वणीच्या सपोनि चौधरी, पोलीस उपनिरीक्षक धीरज गुल्हाने, पोलीस उपनिरीक्षक महापुरे, पोलीस उपनिरीक्षक वडतकर यांच्यासह 42 पोलीस कर्मचारी, 32 होमगार्ड जवान आणि 6 एसएफ कर्मचारी सहभागी झाले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

रूट मार्च सकाळी 11 वाजता टिळक चौकातून सुरू झाला. शहरातील प्रमुख मार्ग जसे की खाती चौक, गांधी चौक, सुभाष चंद्र बोस चौक, टागोर चौक आणि आंबेडकर चौक या मार्गांवरून मार्गक्रमण करत दुपारी 12 वाजता टिळक चौकात परत येऊन रूट मार्च पोलीस स्टेशन येथे समाप्त झाला.

या रूट मार्चचा उद्देश नवरात्रौत्सवादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखणे हा होता. वणी पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सज्ज आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वणी पोलिसांनी केले आहे.

Comments are closed.