विवेक तोटेवार, वणी: गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी उकणी येथील एका तरुणाने पाटाळा येथील पुलावरून उडी घेतली होती. त्याचा युद्धपातळीवर शोध सुरू होता. अखेर दोन आठवड्यानंतर गुरुवार 1 ऑक्टोबर रोजी त्याचा मृतदेह गोंडपिंपरी येथील सकलूर गावाच्या नदीपात्रात आढळून आला. त्याच्या कपड्यावरून त्याची ओळख पटल्याची माहिती सध्या प्राप्त होत आहे.
17 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास पाटाळ्याच्या पुलावर उकणी येथे राहणाऱ्या ईश्वर शिवशंकर शुक्ला (23) याची दुचाकी (MH29 BV9419) व मोबाईल आढळून आला होता. त्यामुळे त्याने नदीत उडी घेतल्याचा संशय व्यक्त केला जात होता. रेस्क्यू टीम ईश्वरचा शोध घेत होती. परंतु एक आठवडा होऊनही त्याचा मृतदेह मिळाला नसल्याने अखेर शोधकार्य थांबवण्यात आले होते. याबाबत विविध तर्कवितर्कही लावले गेले होते.
अखेर गुरुवारी 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ईश्वर याचा मृतदेह गोंडपिंपरी तालुक्यातील सकलूर या गावाच्या नदीपात्रात आढळून आला. ईश्वराचा मृतदेह हा अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मिळाला. त्याच्या कपड्यावरून त्याची ओळख पटल्याची माहिती आहे. याबाबत ईश्वरच्या कुटुंबियांना माहिती मिळताच ते घटनास्थळी रवाना झाले होते.
ईश्वर शुक्ला (23) हा उकणी येथील रहिवाशी होता. तो गावातच त्याच्या आईसोबत राहायचा. एका ट्रान्सपोर्ट कंपनीत तो काम करत होता. 17 सप्टेंबरला तो 24 तासाची ड्युटी करून घरी आला होता. संध्याकाळपर्यंत तो गावातच होता. मात्र त्यानंतर तो बेपत्ता झाला होता. पाटाळ्याच्या पुलावर संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास त्याची दुचाकी आणि मोबाईल पाटाळ्याच्या पुलावर आढळला होता. त्यावरून त्याने उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. वर्धा नदीच्या पात्रात चार ते पाच दिवस त्याचा शोधही युद्धपातळीवर सुरू होता. मात्र मृतदेह न आढळल्याने शोधकार्य थांबवण्यात आले होते. या घटनेच्या आधीच उकणी येथील आणखी एका तरुणाने आत्महत्या केली होती.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)