पाटाळ्याचा पूल काही काळ पाण्याखाली, सकाळी वाहतूक सुरळीत

अपर वर्धा धरणातून 24 घ.मी. पाण्याचे विसर्ग, नदी काठावरील गावांना धोका, सावंगी गावाचा तीन दिवसांपासून संपर्क तुटला

जितेंद्र कोठारी, वणी: पावसाचा तडाखा अद्याप कायम आहे. मागील 7 दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. वर्धा नदीवरील पाटाळा येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे नागपूर मार्गावर वाहतूक काही काळासाठी बंद झाली होती. मात्र सकाळी पाणी ओसरल्याने वाहतूक पुन्हा सरळीत झाली. दरम्यान काही काळासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला मोठ्या संख्येने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर सावंगी येथील गावाचा गेल्या तीन दिवसांपासून संपर्क तुटलेला आहे. दरम्यान गावात पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने बोटीद्वारा पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी गावक-यांनी केली आहे.

बुधवारी सायंकाळी 6 वाजता अपर वर्धा धरणातून 24 घ.मी. पाण्याचे वर्धा नदी पात्रात विसर्ग करण्यात आले. त्यामुळे रात्री वर्धा नदीच्या पात्रात अचानक वाढ झाली. पाटाळ्याच्या पूलही काही काळ पाण्याखाली गेला होता. त्यामुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र काही काळाने वाहतूक सुरळीत झाली. धरणाचे दरवाजे उघडल्याने परिसरातील नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होणार आहे. तसेच नाल्याचे पाणीही नदीला मिळत असल्याने नदी काठावरील गावाच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मागील सात दिवसांपासून संततधार पावसामुळे वणी उप विभागातील सर्व नदी नाले ओव्हरफ्लो झाले आहे. पैनगंगा, वर्धा, निर्गुडा व विदर्भा नदी दुथडी वाहत आहे. मुसळधार पावसामुळे ग्रामीण उप विभागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील सावंगी, मुंगोली, चिंचोली, वडा जुगाद, माथोली या गावांना पाण्याने वेढा घातला आहे. प्रशासनाने जुगाद येथे रेस्क्यू टीम तैनात केली आहे.

सावंगी (नवीन) गावाचा तीन दिवसांपासून संपर्क तुटलेला
सावंगी गावाच्या एका बाजूने शेवाळा नाला, दुस-या निर्गुडा नदी आहे. निर्गुडा नदीवरील पूल पुरामध्ये बुडून आहेत तर शेवाळा नालाही दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे सावंगी (नवीन) या गावाचा 11 तारखेपासून संपर्क तुटला आहे. या गावातील रहिवाशी सावंगी (जुने) येथे लावलेल्या आरओ केंद्रातून पिण्यासाठी पाणी आणत होते. मात्र नदीला पूर आल्याने पिण्याचे पाण्याची समस्या उद्भवली आहे. पिण्याचे पाणी नसल्याने डायरिया व गेस्ट्रो सारखे आजार उद्भवण्याची भीती आहे. बोटीद्वारे गावात आरओचे किंवा शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी गावकऱ्यांनी सोशल मीडिया मार्फत आपत्ती व्यवस्थापन समितीला साकडे घातले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.