झरी, (सुशील ओझा): झरी तालुक्यातील पाटण येथे जिल्हा परिषद शाळेत ११ मार्च रविवारला उभ्या व आडव्या बाटलीसाठी मतदान होणार आहे. सकाळी ८ वाजतापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हे मतदान घेण्यात येणार आहे. मतदाना नंतर लगेच सायंकाळी सहा वाजता मतमोजणी करण्यात येणार असून मतदानाचा निकाल त्वरित मिळणार आहे.
यापूर्वी २८ जानेवारीला परवाना धारक देशी दारूचे दुकान बंद करण्याकरिता करीता सकाळी ८ वाजतापासून दुपारी २ वाजेपर्यंत आडव्या व उभ्या बाटली साठी मतदान घेण्यात आले होते. १४५६ पैकी ५८३ महिलांनी मतदान केले. ४०.०४ टक्के एकूण मतदान झाले होते. पन्नास टक्क्यापेक्षा कमी मतदान झाल्यामुळे उभ्या बाटलीचा विजय झाला होता.
पाटण येथील महिला गावातील दारूबंदी करीता घेण्यात येणा-या मतदानाकरीता घराबाहेर पडल्या नाहीत. यामागे राजकारणी लोकांचा हात होता. महिलांवर राजकारण्यांनी दबाव आणला. तसेच पाच वाजेपर्यंत मतदानाचा वेळ न देता दोन वाजेपर्यंतचा वेळ दिला. त्यामुळे महिलांचे मतदान कमी झाल्याने उभ्या बाटलीचा विजय झाला. असा आरोप राम आईटवार यांनी केला.
मतदानासाठी कमी वेळ मिळाल्याने मतदान कमी झाले परिणामी उभ्या बाटलीचा विजय झाला. त्यामुळे सौ. विणा राम आईटवार यांनी २९ जानेवारी ला जिल्हाधिकारी यांना निवेदनातुन फेरमतदानाची मागणी केली. यात सकाळी ८ ते ५ वाजेपर्यंत दुसऱ्यांदा दारूबंदीची निवडणूक घेण्यात यावी अशी विनंती केली केली. मागणीची दखल घेऊन प्रशासनाने फेरमतदानाकरीता ११ मार्च ही तारीख दिली आहे.
दारुबंदीविरोधात होणा-या या मतदानाकडे आता झरी तालुक्यातीलच नाही तर परिसरातील जनतेचेही लक्ष लागले आहे. आता पाटण येथील परवाना धारक देशी दारूचे दुकान बंद होईल की सुरू राहिल हे रविवारी मतदानानंतर स्पष्ट होईल. गावात दारूबंदी व्हावी यासाठी दारुबंदी अभियानाच्या महिला जनजागृती करत आहे.