पाटण पोलिसांचा तपास पूर्ण होऊनही रेती चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात विलंंब!

राजकीय दबाव, की आणखी काही, चर्चेला पेव

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सुरदापूर येथे २५ मे रोजी नायब तहसीलदार गोल्हर व पटवारी यांनी गावातील भूमन्ना जंगावार यांच्या घरासमोर ४ ब्रास व गट क्र ५ मध्ये ३ ब्रास असा एकूण ७ ब्रास रेती साठा गावकऱ्यांसमोर जप्त करून पोलीस पाटील रवींद्र येल्टीवार यांना सुपूर्दनाम्यावर दिला. तहसीलदार यांनी पंचायत समितीला पत्र देऊन सदर रेती शासनाच्या घरकुल बांधकाम करिता वापर करून ताब्यात घेण्याचे सांगितले.

गटविकास अधिकारी यांनी दुसऱ्या दिवशी काही कर्मचारी रेती आणण्याकरिता पाठविले असता तेथील चार ब्रास रेती रातोरात गायब झाली. याबाबतची माहिती कर्मचाऱ्याने गटविकास अधिकारी सुधाकर जाधव यांना दिली . जाधव यांनी पत्राद्वारे तहसीलदार यांना सदर ठिकाणी रेती नसल्याचे कळविले. ७ ब्रास रेती सुपूर्दनाम्यावर दिल्यानंतर गावातीलच सरपंचाचे पती संकसनवार व मुरली वैद्य या दोघांनी न विचारता अवैध रेतीसाठा सिमेंटरोडच्या कामात वापरली अशी तक्रार पाटण पोलीस स्टेशनला दिली. कार्यवाहीची मागणी केली आहे.

सुरदापूर येथील जप्त केलेल्या रेतीची चोरीची तक्रार रमेश सनसंनवार यांनी तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांसह वरीष्ठांपर्यंत केली होती. त्याच अनुषंगाने रेतीचोरीची चौकशी झाली. शासनाचे नियम डावलून गावातीलच लोकांनी सिमेंट रोडच्या कामात जप्त केलेल्या रेतीचा वापर केला. रेतीसाठा पोलीस पाटील यांच्या सुपूर्दनाम्यावर दिल्यानंतरही रेतीची विल्हेवाट कशी लावली असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

तहसीलदार यांनी पोलीस पाटील यांना रेती चोरीची तक्रार पाटण पोलीस स्टेशन देऊन फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. पोलीस पाटील यांनी पाटण पोलीस स्टेशनला ११ जुलै रोजी तक्रार दिली. पोलिसांनी सखोल चौकशी केली आहे. चौकशी दरम्यान तक्रारकर्त्यासह अनेकजण आरोपीच्या पिंजऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

आरोपींमध्ये काही राजकीय लोकांचे नातेवाईक अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राजकीय दबाव टाकण्यात येत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. आर्थिक व्यवहारसुद्धा झाल्याचे बोलले जात आहे. पोलिसांचा संपूर्ण तपास होऊनही सदर रेतीचोरट्यावर गुन्हे का दाखल केले जात नाहीत, असा संतप्त प्रश्न जनता करीत आहे.

 तक्रारीवरून संपूर्ण तपास झाला आहे. तक्रारकर्ताच संशयाच्या भोवऱ्यात असल्यामुळे आम्ही त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करू शकत नाही. त्याकरिता आम्ही तहसीलदार यांना दोन वेळ पत्र दिले. तलाठी, मंडळ अधिकारी, किंवा कुठलाही कर्मचारी तक्रार देण्याकरिता पाठवा. परंतु कुणीच आले नसल्याने गुन्हा पेंडिंग आहे. तक्रार देताच गुन्हे दाखल करतो.

-अमोल बारपात्रे
ठाणेदार, पाटण

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.