पाटणच्या वादग्रस्त ठाणेदाराची अखेर बदली
परिसरात वाढलेले अवैध धंदे व महिलेसोबतचे प्रकरण भोवले
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत जनावर, गुटखा, गांजा, तांदूळ तस्करी तसेच मटका, अवैध दारू, गोमांस विक्रीमुळे पाटण पोलीस स्टेशन चांगलेच चर्चेत आहे. दरम्यान गतकाही महिन्यात याठिकाणी घडलेल्या विविध घटनांमुळे वादग्रस्त ठरलेल्या ठाणेदार शिवाजी लष्करे यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांना उमरखेड येथे बदली देण्यात आली असल्याची माहिती आहे.
पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत बोरी, मरेगाव, उमरी, वणी, पांढरकवडा, कळंब, राळेगाव, नागपूर कामठी येथील गो तस्करांनी ठाणेदार व काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने चारचाकी ट्रकने दिग्रस येथील पुलावरून अनंतपूर मार्ग तेलंगणात तस्करी चालविली. तसेच पाटण, झरी, माथार्जुन व शिबला येथे खुलेआम मटका सुरू करण्यात आले आहे. लिंगटी, झरी, माथार्जुन, वठोली, मांडवी, मारोती पोड, जामणी, दुर्गापूर, मुची, पाटण, सातपल्ली, देमबाडदेवी या गावात अवैध दारू विक्रीचा महापूर वाहत असताना कुठलीही कारवाई झाली नाही.
त्यामुळे लहान मुलापासून वयोवृद्ध दारू विक्री व पिण्याच्या आहारी गेले. पांढरकवडा, मारेगाव, वणी, मुकुटबन व इतर ठिकाणावरून दररोज शेकडो जनावर पायदळ तस्करी केली जात आहे. लष्करे यांनी वरील कारनामे करून मोठी कमाई केली. परंतु या व्यतिरिक्त शिवसेनेचे दयाकर गेडाम यांच्याशी वाद घातल्याने झरी बसस्टँडवर दोघात हाणामारी झाली. पाटण येथील देशी दारू बंद करण्यासाठी मतदान होणार होते. मात्र त्यावेळेस एका आदिवासी महिलेच्या अंगावर हात उचलला होता.
ते प्रकरण गावातील सामाजिक कार्यकर्ते राम यांनी निपटविले तर कोडपाखिंडी येथील आदिवासी महिलेला पोलीस स्टेशनमध्ये अश्लील शिवीगाळ व जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबतची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे झाली होती. त्यावेळेस रातकीय बळाचा वापर करून प्रकाश नामक व्यक्तीकडे जाऊन प्रकरण निपटविले.
एवढेच नव्हे तर यवतमाळ येथील महिला पाटण ठाण्यात आली असता, तिला नेहमी मारहाण करणे हा संपूर्ण प्रकार ग्रामवासी व तालुक्यातील जनतेला तसेच पोलीस खात्यातील बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहीत आहे. तसेच सदर महिलेला मारहाण करीत असल्याचे फोटो अनेकांजवळ असल्याचे बोलले जात आहे.
या प्रकरणामुळे पोलीस खात्याची तालुक्यात मोठी बदनामी झाली. सदर कृत्यातून खाकीला डाग लावल्याची चर्चा आजही आहे. या सर्व कारनाम्यामुळे वादग्रस्त ठाणेदार लष्करे यांची उचलबांगडी केल्याची खमंग चर्चा तालुक्यात सुरू आहे.
.