विवेक तोटेवार, वणी: एकीकडे तालुक्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. गेल्या आठवड्यात 4 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे एकीकडे नागरिकांची चिंता वाढत असतानाच दुसरीकडे आता वणीत खासगी कोविड केअर सेंटरसाठी परवानगी मिळाण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना चांगलाच दिलासा मिळू शकतो. याबाबत प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. हे सेंटर 50 खाटांचं राहणार असून यात अत्याधुनिक सेवा सुविधा दिल्या जाणार आहे. या प्रस्तावित सेंटरचे सध्या युद्धपातळीवर काम सुरू आहे. आठवडाभरात सेंटर सुरू होण्याची शक्यता आहे. याचा वणी, मारेगाव, वरोरा, पांढरकवडा, झरी इत्यादी तालुक्यातील रुग्णांना फायदा होऊ शकतो.
तालुक्यात करोना संसर्गाची भविष्यात उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेता काही उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यातच शासकीय रुग्णालयांवर पडणारा ताणही वाढला. ही बाब लक्षात घेऊन वणीत खासगी कोविड केअर सेंटर सुरू करण्यास आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पुर्तता करण्याचे काम सुरू आहे. डॉ. महेंद्र लोढा व डॉ. गणेश लिमजे यांच्या पुढाकारातून नवीन खासगी कोविड केअर सेंटर सुरू होणार आहे.
काय असणार नवीन खासगी सेंटरमध्ये सुविधा?
नवीन खासगी कोविड केअर सेंटर हे अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असेल. येथे रॅपिड ऍन्टिजन टेस्ट केली जाणार ज्याचा रिपोर्ट केवळ अवघ्या काही वेळात येणार, तसेच आरटीपीसीआर स्वॅब टेस्टनुसार केलेल्या टेस्टचा रिपोर्टही 24 तासांच्या आत प्राप्त होणार. रुग्णांना ऑक्सिजन व्हेंटिलेटरची सुविधा असणार. रुग्णांना आवश्यक असलेल्या मल्टिस्पेशालिटी सेवा, सेपरेट टॉयलेट बाथरूम, सकस आहार, व्हायफाय याशिवाय शासनाने कोविड केअर सेंटरमध्ये सोयी सुविधांसाठी जे मार्गदर्शक तर्त्वे जाहीर केली आहेत, त्यानुसार सर्व सोयीसुविधा दिल्या जाणार.
रुग्णांची आर्थिक लूट होणार नाही – डॉ. महेंद्र लोढा
अलीकडे क्रिटीकल रुग्णांना यवतमाळ, नागपूर येथे उपचासाठी दाखल करण्यास विलंब झाल्यास त्याच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र त्यांना गावातच योग्य तो उपचार मिळाल्यास हा धोका टाळता येऊ शकतो. सध्या खासगी कोविड केअर सेंटरबाबत अनेक अप्रिय गोष्टी पसरल्या आहेत. मात्र वणीत सुरु होणा-या सेंटरमध्ये रुग्णांची कोणतीही आर्थिक पिळवणूक होणार नाही याची मी ग्वाही देतो. शासनाने जे दर निश्चित केले आहेत, त्यानुसारच इथे रुग्णांना उपचार मिळणार.
– डॉ. महेंद्र लोढा
रुग्णांची हेळसांड थांबणार – डॉ. गणेश लिमजे
कोरोनावरची येणारी लशीचे काम जोमात सुरू होते. ऑक्सफर्डची लस लवकरच येणार अशी चिन्हे असतानाच त्याच्या टेस्टचे काम थांबवण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनावर लस येण्यास आणखी किती काळ जाणार हे निश्चित सांगता येणार नाही. तसेच नागपूर, चंद्रपूर सारख्या ठिकाणी उपचारासाठी जाऊन ही रुग्णांना बेड मिळण्यास अडचण येत आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळणे कठिण होत आहे. वणीतील नवीन खासगी कोविड केअर सेंटरमुळे रुग्णांची होणारी हेळसांड थांबणार आहे.
– डॉ. गणेश लिमजे
केवळ यवतमाळ नव्हे तर अख्या महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. वणी परिसरातील अनेक लोक सध्या योग्य उपचारासाठी नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ येथे धाव घेत आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे बेड मिळत नसल्याने रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय खासगी रुग्णालयातही मोठी वेटिंग लिस्ट आहे. बेड व वेळीच उपचार न मिळाल्याने रुग्णांना जीव देखील गमवावा लागल्याच्या बातम्या सातत्याने येत आहे. अशातच वणीत खासगी कोविड केअर सेंटरला परवानगी मिळाल्याने परिसरातील रुग्ण व संशयीतांना याचा चांगला फायदा होऊ शकतो.