जितेंद्र कोठारी, वणी : दुचाकीची झाडाला ठोस लागून घडलेल्या अपघातात वणी येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. वणी भालर मार्गावर बुधवार 18 मे रोजी रात्री 8 वाजता दरम्यान ही घटना घडली. विनोद मारोती जगताप (34) रा. पटवारी कॉलोनी वणी असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार छोरिया लेआऊट मधील एका वाटर फिल्टर प्लांटमध्ये वाहनचालक म्हणून कार्यरत विनोद जगताप बुधवारी सायंकाळी खाजगी कामानिमित्त दुचाकीने भालर येथे गेला होता. भालर येथून परत येताना अंधाराच्या काळोख्यात एका टर्निंगवर दुचाकी झाडावर जाऊन आदळली. त्यात विनोदच्या चेहऱ्यावर व डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जागीच गतप्राण झाला.

अपघाताची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. येथील ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम करून मृतदेह कुटुंबियांना देण्यात आले आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.
दुचाकीस्वारांनी हेलमेट वापरण्याचे आवाहन
काम, नोकरी, बाजार इत्यादी कारणांसाठी मोठ्या प्रमाणात लोक तालुक्याच्या ठिकाणी दुचाकीने येतात. तसेच अनेक लोक नोकरी व इतर कामांसाठी दुचाकीने परगावी जातात. अवजड वाहनांची रहदारी, खराब रस्ते किंवा वन्य प्राणी आडवे आल्याने अपघाताच्या घटना नित्याच्याच आहे. या अपघातात सर्वाधिक मृत्यू हे डोक्याला गंभीर ईजा झाल्याने होतात. अनेक तरुण तसेच घरातील कर्त्याधर्त्या व्यक्तींना डोक्यावर केवळ हेलमेट नसल्याने जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे फक्त डोक्यावर हेलमेट असल्याने अनेकांचा जीव वाचला आहे. त्यामुळे दुचाकी चालकांनी हेलमेटचा वापर करावा असे आवाहन ‘वणी बहुगुणी’ तर्फे करण्यात येत आहे.
हे देखील वाचा –
