कुत्र्याला फिरवायला गेलेल्या व्यक्तीच्या अंगावर नेली भरधाव बस

मालक किरकोळ तर कुत्रा गंभीर जखमी, जुन्यावादातून बस अंगावर आणल्याचा आरोप

बहुगुणी डेस्क, वणी: जुन्या वादातून एसटी डेपोच्या एका चालकाने दुस-या चालकावर बस नेली. शनिवारी सकाळच्या सुमारास वणीतील मुकुटबन चौफुलीजवळ ही घटना घडली. यात चालकाच्या टोंगळ्याला मार लागला तर त्यांच्या सोबत असलेला कुत्रा जखमी झाला आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारदार सुनील मोतीराम नैताम (49) हे वणीतील मुकुटबन रोड, सुगम हॉस्पिटल जवळ राहतात. ते वणी एसटी डेपोत चालक या पदावर नोकरी करतात. याच डेपोत संदीप भगत (45) रा. एकता नगर हे देखील चालक म्हणून काम करतात. सुनील आणि संदीप या दोन्ही चालकात 8 महिन्यांपूर्वी काही कारणास्तव वाद झाला होता. त्यामुळे त्यांच्या सलोख्याचे संबंध नाहीत.

शनिवारी दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सुनील हे सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास मुकुटबन रोडवर असलेल्या एका पान टपरीवर गेले होते. घरच्या कुत्र्यालाही त्यांनी फिरवायला सोबत घेतले. फिरून परत येताना स. 9.15 वाजताच्या सुमारास मुकुटबन फाट्याजवळील चौफुलीवर वणी कडून एक निळ्या रंगाची बस (MH40-AQ-6092 वणी आगार) आली. सुनील कुत्र्यासह रस्ता क्रॉस करताना बस चालकाने भरधाव वेगात सुनील यांच्या अंगावर बस नेली. त्यामुळे कुत्रा देखील सैरभर झाला. तर अचानक अंगावर बस आल्याने सुनील हे डिवायडरवर पडले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यात सुनील यांच्या टोंगळ्याला मार लागला तर बसच्या चालकाच्या बाजूचे चाक कुत्र्याच्या पायावरून गेले. त्यामुळे कुत्र्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांनी बस कुणी चालवत आहे पाहिले असता त्यांना संदीप भगत बस चालवत असताना दिसला. सुनील यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठत आरोपी संदीप भगत विरोधात तक्रार दिली. जुन्या वादातून संदीपने गाडी अंगावर आणली, असा आरोप सुनील यांनी केला आहे. पोलिसांनी बीएनएसच्या कलम पोलिसांनी 125(a), 281, 324(4) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस शिपाई सचिन मडकाम करीत आहे.

Comments are closed.