‘8 PM’ च्या धास्तीने पेट्रोल पंपावर वणीकरांची एकच गर्दी
200 रुपये पेट्रोल होण्याच्या अफवेने घबराट, रात्री उशिरा पर्यंत रांगा
बहुगुणी डेस्क, वणी: सोमवारी वणी शहरात पेट्रोलचे दर गगणाला भीडणार व पेट्रोलचा शॉर्टेज असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरताच वाहनचालकांनी पेट्रोल पंपांवर एकच गर्दी केली. सायंकाळपासून सुरू झालेली ही धावपळ रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. अनेकांनी संभाव्य दरवाढीच्या भीतीने आपल्या वाहनांमध्ये पेट्रोल भरून घेतले. तर काहींनी 200 रुपयांपेक्षा अधिकचे पेट्रोल देण्यात येत नसल्याचीही आपबिती बोलून दाखवली आहे. दरम्यान पेट्रोल दरवाढ किंवा तुटवडा ही केवळ अफवा असल्याने अफवांकडे लक्ष देऊ नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
इराण-इज्राईल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात इंधन व गॅस टंचाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. व्यावसायिक गॅसचा काही प्रमाणात तुटवडा जाणवत असल्याने तसेच घरगुती सिलिंडर वितरणालाही विलंब होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. दरम्यान रविवारी इराण-इस्राईल युद्ध अनुयुद्धाच्या दिशेने वाटचाल करत आहे का? अशी चर्चा मीडियात रंगू लागली. तसेच युद्धाची तीव्रता वाढल्यास जगभरात आणखी गॅस व पेट्रोलची टंचाई जाणवेल असा अंदाज व्यक्त होऊ लागला.
वणीमध्ये पेट्रोलचा तुटवडा आहे. युद्धची तीव्रता वाढल्यास आणखी तुटवडा निर्माण होणार अशी अफवा शहरात पसरली. तसेच मर्यादित पेट्रोल देण्यात येत असल्याने देखील वणीकरांयी काळजी वाढली. नागपूर येथेही काही पेट्रोल पंप वरचा साठा संपल्याच्या बातम्षा आल्या. विशेष म्हणजे, सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत बोलणार असल्यामुळे पेट्रोल 200 रुपये लीटर जाहीर करणार, अशी अफवा अधिकच वेगाने पसरली, असेही बोलले जात आहे.
नागरिकांनी संयम बाळगावा, अफवांपासून दूर राहावे
सध्या वणी शहरात किंवा आसपासच्या भागात पेट्रोल, डिझेल किंवा कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा नाही. सोशल मीडियावर किंवा तोंडी पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. अशा अफवांमुळे अनावश्यक गर्दी निर्माण होऊन नागरिकांनाच त्रास होतो. जर भविष्यात कोणताही तुटवडा निर्माण झाला, तर त्याबाबत शासन स्तरावरून अधिकृतरीत्या माहिती दिली जाईल. नागरिकांनी संयम बाळगावा आणि अफवा पसरविणाऱ्यांपासून दूर राहावे.
– विवेक पांडे, ना. तहसिलदार, वणी
शहरात पसरलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली घाईगडबड ही पूर्णपणे निराधार असल्याचे प्रशासन आणि पेट्रोल पंप चालकांनी स्पष्ट केले आहे. इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू असून दरवाढीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांना बळी न पडता संयम राखावा, अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र तुटवडा नसताना पेट्रोल मर्यादित का दिले जात आहे? हा प्रश्न अनुत्तरित आहे.


Comments are closed.