फुलशेती करणा-या सुकनेगाव येथील युवा शेतक-याचा लखनौ येथे सन्मान

निकेश जिलठे, वणी: सचिन राजूरकर हे 30 वर्षांचे युवा शेतकरी. शिक्षण अवघं जेमतेम. सुकनेगाव शेतशिवारात फुलशेतीच्या माध्यमातून ते आज वार्षिक 10 लाखांचं उत्पन्न घेतात. पारंपारिक शेतीला फाटा देत नवी वाट निवडणा-या या प्रगतशील व युवा शेतक-याचा लखनौ येथे आयोजित पुष्प कृषी मेळावा व बोगनविलिया फेस्टिवलमध्ये विदर्भातील उत्कृष्ट शेतकरी (फुलशेती) म्हणून सन्मान करण्यात आला. देशातील नामांकित व केंद्रशासनाच्या CSIR-NBRI (नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्टीट्यूट) या संशोधन संस्थेद्वारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी दिनांक 19 मार्च रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

सचिन राजूरकर यांचे वय अवघे 30 आहे. त्यांच्याकडे 15 एकर शेती आहे. यातील 6 एकर शेतीमध्ये ते झेंडू, निशिगंधा, शेवंती, गुलाब इत्यादी फुलांची शेती करतात. तर उर्वरित शेतीत ते पारंपरिक पिकं घेतात. आज वर्षांला फुलशेतीतून त्यांना सुमारे 10 लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न होते. शिवाय परिसरातील काही शेतक-यांना देखील फुलशेतीसाठी प्रोत्साहित केले आहे. आज जरी सचिन राजूरकर यांच्या शेतातील फुले परिसरातील विविध ठिकाणी जात असले, तरी त्यांचा हा प्रवास अनेक खाचखडग्यांनी भरलेला होता. 

बालपणापासूनच सचिनला शेतीची आवड आहे. जेव्हा शाळेपेक्षा बांधावर मन अधिक रमते असे लक्षात आले, तेव्हा त्यांनी शिक्षणाला रामराम करून आपले संपूर्ण लक्ष शेतीवर केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला. शेतक-यांचे शेतीतील विविध प्रयोग, परंपरिक शेतीला फाटा देऊन काही करता येते का? याची माहिती काढण्यासाठी ते विविध ठिकाणी भटकंती करायचे. अशातच 2012 साली ते पुणे जिल्ह्यातील एका संस्थेच्या संपर्कात आले. ही संस्था फुलशेतीबाबत मार्गदर्शन करते. या संस्थेला भेट देऊन त्यांनी फुलशेतीची संपूर्ण माहिती काढली. शिवाय या परिसरात फुलशेती करणा-या विविध शेतक-यांच्या शेतात भेट देऊन त्यांनी या शेतीतील फायदे तोटे जाणून घेतले. 

2013 साली सचिनने फुलशेती करण्याचा निर्णय घेतला. याला घरून देखील समर्थन मिळाले. पहिल्या वर्षी प्रयोग म्हणून त्यांनी 1 एकर मध्ये झेंडूचे उत्पादन घेतले. त्या वर्षी त्यांना वार्षीक 60 हजारांचे उत्पन मिळाले. उत्पन्न कमी असले तरी पहिल्या वर्षीचा अनुभव हा पुढील कामासाठी प्रेरणा देऊन गेला. पुढे एक एकर पासून सुरू झालेला हा प्रवास आज 6 एकर पर्यंत पोहोचला व वार्षिक 60 हजारांचे उत्पन्न आज 10 लाखांवर गेले. यात 30 टक्के खर्च वजा केल्यास 70 टक्के नफा आहे. त्यांनी सुरूवातीला फक्त झेंडूचे उत्पादन घेतले. आज झेंडूसह शेवंती, निशिगंधा, गुलाब इत्यादी फुलांचे उत्पादन त्यांच्या शेतात होते. शिवाय वणी परिसर, चंद्रपूर, यवतमाळ इत्यादी भागातही त्यांच्या शेतातील फुले जातात.

नवीन प्रयोग करण्याची जिद्द…
फुलशेतीत चांगले उत्पन्न असल्याचे लक्षात आल्यावर सचिन यांनी परिसरातील आणखी काही ओळखीच्या शेतक-यांना फुलशेतीबाबत प्रोत्साहित केले. आज ते देखील पारंपरिक शेतीसह फुलशेती करीत आहे. फुलशेतीमध्येच नवनवीन प्रयोग करण्याची त्यांची इच्छा आहे. अनेक फुलांच्या प्रजाती या मोकळ्या वातावरणात होत नाही. त्यामुळे भविष्यात पॉली हाऊस मध्येही फुलशेती करण्याचा त्यांचा मानस आहे.

फ्लोरिकल्चर मिशनचे मार्गदर्शन
केंद्र शासनाच्या फ्लोरिकल्चर मिशनद्वारा फुलशेती करण्यासाठी शेतक-यांना प्रोत्साहित केले जाते शिवाय त्यांना फुलशेती करणा-या शेतक-यांना मार्गदर्शन देखील केले जाते. 4 वर्षाआधी शासनाच्या फ्लोरिकल्चर मिशन अंतर्गत NBRI संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. विजय वाघ, डॉ. जीवन व त्यांची चमू यांनी सुकनेगाव येथील सचिनच्या फुलशेतीला भेट दिली होती. सचिनचे फुल शेती करण्याचे कौशल्य पाहून संस्थेने सचिनला याबाबत मार्गदर्शन केले तसेच काही फुलांच्या प्रजाती देखील दिल्या. नवीन प्रजातीच्या लागवडीतून फुलशेतीचे उत्पन्न अचानक वाढले. त्याच्या या कामाची दखल घेऊन CSIR-NBRI (नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टीट्यूट) या केंद्रशासनाच्या संस्थेद्वारा रविवारी एका सोहळ्यात विदर्भातील उत्कृष्ट शेतकरी (फुलशेती) म्हणून गौरविण्यात आले.

युवा शेतक-यांनी फुलशेतीकडे वळावे – सचिन राजूरकर
फुलशेतीला चांगले मार्केट आहे. शिवाय याचा उत्पादन खर्च देखील अवघा 25 ते 30 टक्के आहे. वर्षभर फुलांना मागणी असते. शिवाय विविध सणांच्या दिवशी याची मोठी विक्री होते. अर्धेअधिक उत्पन्न हे लग्नाच्या सिजनमध्ये होते. परिसरातील युवा शेतक-यांनी फुलशेतीकडे वळल्यास हा एक उत्पन्नाचा चांगला पर्याय त्यांच्यासाठी खुला होऊ शकतो. परिसरातील शेतक-यांना फुलशेतीबाबत मार्गदर्शन किंवा माहिती हवी असल्यास त्यांना ती दिली जाईल.
– सचिन राजूरकर, युवा शेतकरी

सचिनचा लखनौ येथे झालेल्या सन्मानाबाबत परिसरात कौतुक होत आहे. सचिन आपल्या यशाचे श्रेय आई, गावकरी व मित्रमंडळींना देतो. (सचिन राजूरकर – संपर्क – 9657087437)

 

Comments are closed.