चिमुकलीला घेतला वराहाने चावा
विवेक तोटेवार, वणी: वणीतील गायकवाड फैलात राहणा-या एका दीड वर्षांच्या चिमुकलीला वराहाने चावा घेतला. यात ती जखमी झाली असून तिच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे.
रेवा गणेश आईलवार ही दीड वर्षांची चिमुकली गायकवाड फैलातील रहिवाशी आहे. सकाळी ती घराबाहेर खेळायला गेली होती. सकाळी साडेआठच्या सुमारात तिला एका डुकराने चावा घेतला. यात तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. परिसरात डुकरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. याआधीही डुकरांनी लहान मुलांवर हल्ला केल्याच्या छोट्यामोठ्या घटना घडल्या आहेत.
याआधी याबाबत वार्डाचे नगरसेवक राकेश बुगेवार यांनी नगर पालिकेच्या सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी या प्रश्नावर उडवा उडवीची उत्तरे दिली होती. नगरसेवक राकेश बुगेवार यांनी आज याबाबत मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्याशी संपर्क केला असता नवीन कंत्राटदाराला कंत्राट दिल्याची माहिती त्यांनी बुगेवार यांनी दिली. याआधीही चिमुकल्यांवर डुकरांनी हल्ला केला आहे. तसंच परिसरातील नागरिकांनाही याचा मोठा त्रास होत आहे. परिणामी रोगराई पसरण्याची भीती आहे. केवळ याच परिसरातच नाही तर संपूर्ण वणी शहरात वराहांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट आहे. याकडे पालिका प्रशासन कधी लक्ष देईल हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.