सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: ‘बैलपोळा’ हा शब्द अलीकडच्या काळात विदर्भातही सर्रास वापरला जातोय. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आणि पत्रकार असलेले श्रीवल्लभ सरमोकदम यांनी हा विचार धरून लावला. पोळा बैलांचाच असतो. तो इतर प्राण्यांचा असल्यास तसं कुणी सांगावं. असा सवालही ते करतात.
यासंदर्भात पंडित प्रा. डॉ. अशोक राणा वणी बहुगुणीशी बोलताना म्हणालेत की, विदर्भाबाहेर पश्चिम महाराष्ट्र, कोकणात बैलपोळा हाच शब्द वापरतात. पोळा हा कृषिसंस्कृतीतून आलाय. अर्थातच हा सण बैलांशी निगडित आहे.
आपल्याला अंधानुकरणाची सवय आहे. पुण्या-मुंबईचं कल्चर आपल्याला आदर्श वाटतं. तेच अनुकरण आपल्याकडे विदर्भातही होत आहे. जे लोक बैलपोळ हा शब्द वापरतात, त्यांना बैल किंवा पोळातरी माहीत आहे, काय हा सवालच आहे. लोकगीत, लोकसंस्कृतीतून पोळा हाच शब्द आलाय. बोलीप्रमाणे तो ‘पोया’ किंवा ‘पोडा’ झालाय, एवढंच.
पत्रकारांनी विशेषतः विदर्भातील पत्रकारांनी ‘बैलपोळा’ हा शब्द वापरायला सुरुवात केलीय. आपण दिव्यांची दिवाळी म्हणत नाही. आपण रंगांची धुळवड म्हणत नाही. तर मग ही द्विरुक्ती कशाला? हा एक सामान्य सवाल आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी ‘शेतकऱ्यांच्या असूड’ या पुस्तकात संबंधित विविध विषय हाताळलेत. तरीदेखील त्यांनी बैलपोळा असा उल्लेख कुठेच केला नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेतील ‘सण-उत्सव’ या अध्यायात पोळा घेतला. पोळा कसा साजरा करावा, ह्याच्या काही मार्गदर्शक सूचना केल्यात. तरीदेखील त्यांनी बैलपोळा हा शब्द वापरला नाही. श्रीवल्लभ यांनी सोशल मीडियावर ही चर्चा केली. त्यांच्या या प्रयत्नाला लोक भरभरून प्रतिसाद देत आहेत.
पोळा या मूळ शब्दावर मी ठाम आहे. हा उपाहासानेही वापरला जातो. एखाद्या पक्षाचा पोळा फुटला असाही प्रयोग होतो. पोळा ही जुनी ओळख का नष्ट केली जात आहे. शहरीसंस्कृती हा शब्द रूढ करण्याचा प्रयत्न करीत आहे. पोळ्याची मूळ आत्मियताा लोप पावत चालली आहे. ज्याची मातीशी, जमीनीशी नाळ जुळली आहे. त्याला हा बदल मुळीच चालणार नाही.
-श्रीवल्लभ सरमोकदम