निकेश जिलठे, वणी: पोळा किंवा बडग्यासाठी बाहेरगावी जात असाल तर सावध राहा ! कारण या दिवशी चोरट्यांची टोळी देखील सक्रिय होते. गेल्या वर्षी पोळा-बडग्याच्या दिवशी मारेगाव येथील एकाच परिसरात एकाच रात्री 15 ते 17 घरफोडी करून चोरट्यांनी खळबळ उडवून दिली होती. विशेष म्हणजे चोरीच्या प्रकरणाचा क्वचितच छडा लागतो. त्यामुळे एकदा दागिने, रक्कम चोरीला गेली की ते परत मिळण्याची शक्यता जवळपास नसतेच. त्यामुळे नागरिकांजवळ केवळ सावधता बाळगणे हा एकच पर्याय शिल्लक आहे.
सलग सुट्टी, चोरांची ड्युटी सुरू….
यावर्षी शुक्रवारी पोळा तर शनिवारी बडगा आहे. त्यानंतर रविवारची सुट्टी आहे. गावी जाऊन पोळा साजरा करण्याची परंपरा आजही पाळली जाते. तसेच सलग तीन दिवस सुटी असल्याने या काळात नातेवाईकांच्या घरी किंवा बाहेरगावी जाण्याचा पर्याय अनेक लोक निवडतात. त्यामुळे हा दिवस चोरट्यांच्या रडारवर असतो. या दिवशी टोळीने चोरटे येतात व घरफोडी करतात. गेल्या वर्षी वणी, मारेगाव, वेकोलि वसाहतीत येथे बडग्याच्या दिवशी अनेक चोरीच्या घटना घडल्या. मारेगाव येथे तर चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच परिसरात 15 ते 17 घरफोड्या केल्यात. यातील 6-7 घरी लोकांनी घरी दागिने व रक्कम न ठेवल्याने चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. मात्र इतर ठिकाणाहून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला.
पोलीस वाढवणार अतिरिक्त गस्त?
बाहेरगावातील अट्टल चोरटे व चोरट्यांची टोळी वणीत येऊन तर वणीतील अट्टल चोरटे हे बाहेरगावी जाऊन चोरी करीत असल्याचे बोलले जाते. वणीत बाहेरगावातील चोरटे असल्याने त्यांची ओळख सहजासहजी पटत नाही. शिवाय चोरटे स्कार्फ, रुमाल बांधून चोरी करीत असल्याचे त्यांची सीसीटीव्हीतून ओळख स्पष्ट होत नाही. विशेष म्हणजे चोरटे मोबाईलचा वापर करीत नाही. त्यामुळे त्यांचे लोकेशनही ट्रेस होत नाही. परिणामी चोरीच्या घटनांचा छडा लागत नाही. पोलिसांनी पोळा, बडगा अशा सणावारांच्या काळात अतिरिक्त गस्त कामाला लावल्यास चोरटे रंगेहात सापडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पोलीस अतिरिक्त गस्त वाढवणार का? याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे.
काय घ्यावी काळजी?
नागरिकांची सतर्कता हीच घरफोडीच्या घटनेत सर्वांत महत्त्वाची ठरते. नागरिकांनी बाहेरगावी जाताना घरी दागदागिने, मौल्यवान वस्तू व रोख रक्कम ठेवू नये. घर बंद करताना उच्च प्रतीचे कुलूपे वापरा आणि दार-चौकट तपासा. बाहेरगावी जात असाल तर शेजाऱ्यांना माहिती द्या. ते घराकडे लक्ष ठेवू शकतात. दागिने आणि रोख रक्कम बँक लॉकरमध्ये ठेवा. घराबाहेरचे लाईट सुरु ठेवा जेणेकरून संशयास्पद हालचाली इतरांना दिसतील. विशेष म्हणजे पोलिसांना बाहेरगावी जात असल्याची माहिती दिल्यास रात्री त्या भागात पोलीस गस्त घालू शकतात. सततच्या घरफोडीमुळे ठाणेदार गोपाळ उंबरकर यांनी देखील बाहेरगावी जात असल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
वणीसह आता वेकोलिच्या वसाहतीही टारगेटवर
सध्या वणीकर घरफोडीने त्रस्त आहेत. चोरट्यांची हद्द म्हणजे ब्राह्मणी रोडवरील एकच घर चोरट्यांनी दोनदा फोडले. विशेष म्हणजे दुस-यांदा चोरट्यांच्या हाती दागिने लागले नसले तरी चांगली रोख रक्कम लागली. सध्या वणीसह वेकोलिच्या कुंभारखनी, भालर टाऊनशिप इत्यादी भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या आठवड्यात या वसाहतीत एकाच रात्री चोरट्यांनी अनेक घरफोडी केल्या. तर नुकतेच कुंभारखनी येथे वेकोलि सुरक्षा रक्षकांनी दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. मात्र त्याचे चार साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले, अशी प्राथमिक माहिती आहे.



Comments are closed.