बहुगुणी डेस्क, वणी: वणी-वरोरा मार्गावरील सावर्ला गावाजवळ गुरुवारी, दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 7 ते 7.30 वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकला दुचाकीने मागून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात भास्कर कुमरे (वय अंदाजे 40) हे मृत्युमुखी पडले.
प्राप्त माहितीनुसार, मृत भास्कर कुमरे हे मुळचे राळेगाव तालुक्यातील कोपरी या गावचे रहिवासी होते. ते महाराष्ट्र शासनाच्या उमेद या अभियानात वणी विभागात ब्लॉक मॅनेजर म्हणून कार्यरत होते. काही दिवसांआधीच त्यांची वणी ब्लॉकमध्ये बदली झाली होती. त्यामुळे ते वरोरा येथे त्यांच्या सासरी राहत होते व रोज मोटारसायकलने वणी-वरोरा दरम्यान प्रवास करत होते.
गुरुवारी दिनांक 21 ऑगस्ट रोजी ड्युटी संपल्यानंतर ते वणीहून वरो-याला त्यांच्या दुचाकीने (MH 29 BB 4449) वरोराकडे जात होते. सव्वा सात वाजताच्या सुमारास सावर्ला गावाजवळ एका उभ्या असलेल्या ट्रकला त्यांची दुचाकी मागून धडकली. या भीषण अपघातात त्यांच्या चेहऱ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलवले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रस्त्यावर उभे असलेले ट्रक हे अपघाताचे कारण ठरत असून या उभ्या ट्रकमुळे सातत्याने अपघाच्या घटना घडत आहे. घटनेचा पुढील तपास वणी पोलिसांकडून सुरू आहे. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



Comments are closed.