विवेक तोटेवार, वणी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वणी विधानसभाक्षेत्रातर्फे 30 सप्टेंबर रविवारला स. 11 ते 4 दरम्यान पोलीसाठी, सैन्य भरतीसाठी आणि खेळाडुंसाठी आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वणीतील शेतकरी मंदिर जवळील वसंत जिनिंग हॉलमध्ये हे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यासाठी सुप्रसिद्ध फिटनेस तज्ज्ञ डॉ. सतीश सोनार आणि सुप्रसिद्ध स्पोर्ट सायकॉलॉजिस्ट डॉ. आशिष कुथे हे तपासणी आणि मार्गदर्शन करणार आहे.
पोलीस भरती आणि सैन्य भरतीची तयारी करणा-यांची संख्या वणी आणि परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र अपु-या तांत्रिक माहितीमुळे व मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांची शेवटच्या क्षणी निराशा पदरी पडते. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांनी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे.
या शिबिरात शारीरिक क्षमता म्हणजेच फिजिकल फिटनेस कसा वाढवावा? भरतीच्या वेळी कोणती तयारी करावी? यासोबतच खेळाडू अनेकदा थकल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे मानसिकरित्या खचतो. अशा वेळी काय करावे याचे ही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
प्रत्येकाचे शरीर आणि फिटनेस वेगवेगळा असतो. कुणाची धावण्याची क्षमता अधिक असते तर कुणाची कमी. शिवाय फिजिकल टेस्टमध्ये पाय, हाड, स्नायू इत्यांदी गोष्टी सक्षम आहे की नाही याचा विचार कुणीही करत नाही. या शिबिरात शरीराची तपासणी करून त्याबाबत योग्य ती माहिती दिली जाणार आहे. तसेच ज्या खेळाडुंमध्ये ज्या सप्लिमेंटची कमतरता आहे. तो कसा भरून काढावा तसेच त्यासाठी कोणता आहार असावा याचेही या शिबिरात मार्गदर्शन केले जाणार आहे.
या शिबिराला उपस्थित राहणारे डॉ. सतीश सोनार हे नागपूर येथील सुप्रसिद्ध स्पोर्ट मेडिसिन आणि फिटनेस तज्ज्ञ आहेत. राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय स्तरावरील अनेक नामवंत खेळाडुंना ते मार्गदर्शन करतात. तर डॉ. आशिष कुथे हे देखील नागपूर येथील सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आहे. अनेक खेळाडुंना ते स्पोर्ट सायकॉलीवर मार्गदर्शन करतात. भरती आणि इंटरव्ह्यू दरम्यान मानसिक स्वास्थ कसे ठेवावे. तसेच स्पोर्ट सायकॉलॉजी याबाबत ते खेळाडुंना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
खेळाडू आणि विद्यार्थ्यांचे योग्य ती तांत्रिक माहिती नसल्याने किंवा योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांची थोडक्यात संधी हुकते. ही बाब लक्षात घेऊन वणीत पहिल्यांदाच अशा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत. सोबतच ब्लड टेस्ट करून योग्य ते औषधीही खेळाडू आणि विद्यार्थ्यांना पुरवली जाणार आहे. अशी माहिती ‘वणी बहुगुणी’शी बोलताना डॉ. महेंद्र लोढा यांनी दिली. या शिबिराला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आणि वणीतील सर्व खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. लोढा यांनी केले.