पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांच्या मोर्चाने दणाणले वणी शहर
नवीन पोलीस भरती प्रक्रियेविरोधात विद्यार्थी आक्रमक
निकेश जिलठे, वणी: वणीमध्ये पोलीस भरतीच्या नवीन प्रक्रियेच्या विरोधात पोलीस भरती करणा-या विद्यार्थ्यांनी भव्य मोर्चा काढला. वणी मारेगाव झरी या तालुक्यातील सुमारे 700 ते 800 विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले होते. क्रीडा प्रशिक्षक प्रा. डॉ. दिलिप मालेकर मार्गदर्शनात व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. नवीन भरती प्रक्रिया लागू करू नये साठी निवेदनही देण्यात आले.
सध्या पोलीस भरतीसाठी उमेदवारांची आधी शारीरिक परीक्षा होते. त्यातून फिट असलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाते. लेखी परीक्षेसाठी एका जागेसाठी 15 उमेदवारांची निवड केली जाते. मात्र सध्या सरकार नवीन पोलीस भरती प्रक्रिया आणण्याची तयारी करीत आहे. यात आधी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षा उतीर्ण केलेल्या उमेदवारांचीच शारीरिक परीक्षा घेतली जाणार आहे.
पोलीस भरतीसाठी शारीरिक तंदुरुस्ती गरजेची आहे. शारीरिक परीक्षेसाठी विद्यार्थी दोन तीन वर्ष मैदानावर सराव करतो. बँक, एमपीएससी, यूपीएससी, स्टाफ सिलेक्शनची तयारी करणारे विद्यार्थी हे लेखी परीक्षेत अव्वल असतात. त्यामुळे नवीन भरती प्रक्रिया आल्यास मैदानावर गेल्या काही वर्षांपासून पोलीस भरतीसाठी घाम गाळणा-या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो. या नवीन भरती प्रक्रियेचा अद्याप शासकीय आदेश आला नसला, तरी हे सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.
दुपारी दोन वाजता शासकीय मैदानावर वणी मारेगाव झरी या तालुक्यातून पोलीस भरतीची तयारी करणारे सुमारे 700 ते 800 विद्यार्थी हजर झाले. क्रीडा प्रशिक्षक डॉ. दिलिप मालेकर यांच्या मार्गदर्शनात व डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकारविरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. मोर्चा शासकीय मैदान ते शिवाजी चौक मार्गक्रमण करत तहसिल कार्यालयात याची सांगता झाली. तहसिल कार्यालयात हा निर्णय मागे घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
डॉ. लोढा जाणार निर्णयाविरोधात न्यायालयात
वणी एक पोलीस भरतीचं मोठं केंद्र आहे. या परिसरातून अनेक गरीब मुल मुली तयारी करून पोलीस विभागात रुजू झाले आहेत. नवीन भरती प्रक्रिया ही अन्यायकारक असून यामुळे मैदानावर घाम गाळणा-या मुलांचे मोठे नुकसान होऊ शकते. सरकारने जर नवीन भरती प्रक्रिया सुरू केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर आंदोलन पुकारणार, तसेच या निर्णयाविरोधात मी स्वतः न्यायालयात पिटिशन दाखल करणार अशी माहिती डॉ. लोढा यांनी दिली.
‘पोलीस बनू देत नसाल तर नक्षलवादी बनू द्या !’
या भरती प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. जर सरकार आम्हाला पोलीस बनू देत नसेल तर त्यांनी आम्हाला नक्षलवादी बनण्याची परवानगी द्या अशी उद्वीग्न प्रतिक्रिया एका विद्यार्थीनीने यावेळी व्यक्त केली. एमपीएससी किंवा बँकेची तयारी करणा-या उमेदवारांची पोलीस भरतीसाठी कोणतीही तयारी नसते. मात्र नवीन भरती प्रक्रिया सुरू झाल्यास मैदानावर घाम गाळणारे घरी आणि कोणताही शारीरिक तयारी न करणारे नोकरीला लागणार अशी प्रतिक्रियाही यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वणी विधानसभा अध्यक्ष जयसिंगजी गोहोकार, प्रभाकर मानकर, राजाभाऊ बिलोरिया, आशाताई टोंगे, पूजा गढवाल, हेमलता लामगे, विजयी आगबत्तलवार, संगीता खटोड, महेश पिदूरकर, स्वप्निल धुर्वे, अंकुश मापूर, सोनू निमसटकर, मारोती मोहाडे, प्रमोद एडलावार, सैयद रविश, महादेव काकडे, राजू उपरकर, संतोष आत्रम, राजू पाचभाई, भास्कर पिंपळकर, योगेश खुटेमाटे, भास्कर आत्राम दिलिप जेनेकर, रमेश बावणे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यासह शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.