हिंसक आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

जितेंद्र कोठारी, वणी : गुरुवार 30 मार्च रोजी रामनवमी, त्यानंतर महावीर जयंती, आंबेडकर जयंती व रमजान ईद सण तसेच मिरवणुका शांततेत पार पडावी. यासाठी वणी पोलिसांनी बुधवारी येथील दीपक चौपाटी भागात मॉकड्रिल (रंगीत तालीम) केली. एसडीपीओ संजय पूज्जलवार व वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्या उपस्थितीत मॉकड्रील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अग्निशमन वाहने आणि रुग्णवाहिका यांचाही या मॉक ड्रीलमध्ये समावेश होता. कवायतीत सहभागी असलेल्या जवानांनी गर्दीचा सामना कसा करायचा आणि मिरवणुकीदरम्यान कोणत्याही आवाजाचा सामना कसा करायचा याची तालीम केली. सिव्हिल ड्रेसमध्ये काही जवान मॉक ड्रिलसाठी आंदोलक म्हणून हजर झाले. एकीकडे घोषणाबाजी करत आंदोलनकर्ते रस्त्यावर टायर जाळून हिंसक झाले होते. तर दुसरीकडे तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्या व अग्निशमन वाहनांच्या मदतीने आंदोलन आटोक्यात आणले. जखमी जवान आणि आंदोलकांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्याची तालीमही करण्यात आली.

मॉकड्रिल दरम्यान मार्गदर्शन करताना एसडीपीओ संजय पुज्जलवार

मॉक ड्रीलनंतर एसडीपीओ संजय पूज्जलवार यांनी सांगितले की, रामनवमी मिरवणुकी संदर्भात मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. रामनवमी मिरवणुकीत कोणताही गोंधळ सहन केला जाणार नाही. कोणत्याही प्रकारची गुंडगिरी आणि गुंडगिरीचा मुकाबला करण्यास पोलीस पूर्णपणे सक्षम आहेत. सर्वसामान्यांनी हा सण शांतता आणि सौहार्दाच्या वातावरणात साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Comments are closed.