फवारणी विषबाधा: कोतवालानंतर आता पोलीस पाटलांचा बळी
प्रशासनाचा अजब न्याय, जखम पायाला मलम कपाळाला
रवि ढुमणे, वणी: फवारणी विषबाधा प्रकरणी आता कोतवालानंतर पोलीस पाटलांवर कार्यवाहीचा बडगा उगारण्यात आला आहे. मारेगाव तालुक्यात ३ पोलीस पाटलांना निलंबित करण्यात आले आहे. तात्याजी चिकाटे (मारेगाव) बंडु वनकर,पिसगाव, संगीता आदेवार (टाकळी) असे त्यांची नावे आहेत. याआधी कोतवाल अशोक केशवराव पेन्दोर (कोतवाल साजा चिंचाळा), उत्तम रामदास आत्रम (कोतवाल साजा कुंभा खंड 1), शशीकांत मधुकर निमसटकर (कोतवाल साजा मारेगाव) यांना निलंबित करण्यात आले आहेत. मारेगावात चौकशी समिती दाखल होत असल्याने मानधनावर काम करणाा-या कनिष्ठ कर्मचा-यांना निलंबित करून हे प्रकरण निपटवण्याचा हा प्रकार असल्याचं यातून दिसून येत आहे.
सध्या केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात शेतक-यांच्या फरवणी दरम्यान झालेल्या मृत्यूनं खळबळ उडवून दिली आहे. मारेगाव तालुक्यातही 4 शेतकरी, शेतमजुरांचा यात मृत्यू झाला आहे. तर 70 पेक्षा अनेक लोक विषबाधित झाले आहेत. मात्र या प्रकरणात मारेगाव तालुक्यात कोतवाल व पोलिस पाटील यांना जबाबदार धरण्यात आलं आहे. या प्रकरणी तीन पोलीस पाटील व तिन कोतवालांना निलंबित केलं आहे. प्रशासनाच्या या अजब न्यायाने जबाबदार असलेले मोकळे सुटणार तर नाही ना असा प्रश्न जनसामान्यांना पडत आहे .
काय म्हणतात तहसिलदार साहेब ?
मारेगावचे तहसिलदार विजय साळवे वणी बहुगुणीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणतात की…
कोतवाल हा गावातील इस्तंभूत माहिती देणारा तलाठी यांना सहाय्यक आहे. निलंबन केले म्हणजे अन्याय नाही तर कामात केलेली चूक आहे. 20 दिवस मृत्यू होऊनही मला माहिती होत नसेल तर काय कामाची सरकारी यंत्रणा. गावपातळीवर पहिले पोलिस पाटील व कोतवाल हेच माहिती देणारे आहे सरकारी लोक आहेत. माझी जबाबदारी मी पार पाडली आहे. जर कार्यवाही चुकीचे असल्यास त्यांनी अपिल करावी किंवा मॅटमध्ये जावे.
वणी बहुगुणीने उपस्थित केलेले प्रश्न…
गावात एखादा मृत्यू झाला तर त्याची माहिती सर्वदूर पोहोचते. एखाद्या शेतक-यांचा फवारणी दरम्यान मृत्यू होतो याची माहिती प्रशासनाला खरच मिळाली नसावी का?
फवारणी आधी जनजागृती करणे गरजेचं आहे. कृषी केंद्रांची तपासणी करणे गरजेचं आहे. कोणत्या कृषी केंद्रात एक्सपायची डेट गेलेले किंवा अवैध औषधी आहे याची माहिती घेणे प्रशासनाचे काम आहे. आधी जनजागृती अथवा कृषी केद्रांची तपासणी का करण्यात आली नाही.
एखाद्याच्या मृत्यूनंतर प्रशासनाला जाग येते. शेतक-यांच्या मृत्यूनंतर प्रशासन खळबळून जागं झालं. म्हणजे प्रशासनाचं काम हे एखाद्याच्या मृत्यूनंतर सुरू होते का? अशा घटना घडू नये यासाठी प्रयत्न करणे ही प्रशासनाची जबाबदारी नाही का?
कृषी अधिकारी आणि तलाठी यांचा या प्रकणात काहीच दोष नाही का ? जर त्यांचाही दोष असेल तर त्यांच्यावर अद्याप कार्यवाही का झाली नाही ? छोट्या कर्मचा-यांवर कार्यवाही करून प्रशासन काय साध्य करू पाहत आहे ?
चौकशी समिती दाखल होत असल्याने कार्यवाही केल्याचे दाखवण्यासाठी मोठ्या पदावरच्या कर्मचा-यांना अभय देऊन मानधनावर काम करणा-या छोट्या पदाच्या कर्मचा-यावर कार्यवाही करण्यात येत आहे का ?
फवारणी विषबाधेला बीटी बियाणे कारणीभूत ?
वर्षानुवर्ष शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करत आहेत. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीही कुणाला विषबाधा झाली नाही. या विषबाधेला बीटी बियाणे कारणीभूत असल्याचे काही जाणकार सांगतात. बीटी बियाण्यांची लागवड केल्या नंतर 30 ते 45 दिवसां पर्यंत रोग येत नसल्याचा दावा बीटी बियाणे कंपनी करतात. यावर विश्वास ठेवून पिकांवर कोणत्या औषधांची फवारणी करू याची विचारणा करण्यासाठी ते कृषिकेन्द्राकडे धाव घेतात. त्यांना कीटकनाशके मिक्स करुन फवारणी करण्याचा सल्ला देखील दिला जातो. त्यामुळे ही विषबाधा झाल्याचे काही जाणकार सांगतात.