कॉन्व्हेंटच्या खोलीमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील मोहोर्ली येथे बंद पडलेल्या एका कॉन्व्हेंट शाळेच्या खोलीमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर वणी पोलिसांनी धाड टाकली. या कार्यवाहीत पोलिसांनी मोहोर्ली येथील 6 जुगाऱ्यांना अटक करून त्यांच्या कडून रोख 16 हजार रुपये जप्त केले. नितीन शामराव नागपुरे (34), राजू महदेव दुबे (52), वसंत विश्वनाथ कोडापे (59), ज्ञानेश्वर शंकर वडस्कर (49) अमोल दामोधर ढवस (34) व राजू नीलकंठ आत्राम (48) सर्व रा. मोहोर्ली, ता. वणी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

वणी येथील पोलीस अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली कि, मोहोर्ली येथील घोंसा रोडचे बाजूने एका बंद पडलेले कॉन्व्हेंटच्या खोलीत काही लोकं गंजीपा पत्यावर एक्का बादशाह कट पत्ता नावाने जुगारावर पैशाची बाजी लावून हारजीतचा खेळ खेळत आहे. माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचे आदेशावरून पो.नि. अजित जाधव व सपोनि माधव शिंदे यांनी पोलीस स्टाफ व पंचासह गुरुवार 7 सप्टे. रोजी दुपारी 4.35 वाजता जुगार अड्ड्यावर रेड केली. पोलिसांना कॉन्व्हेंटच्या एका खोलीत 6 इसम पत्त्यावर जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी सर्व जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता 16 हजार 220 रुपये रोख 52 पत्ते, एक चादर असे एकूण 16 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सदर बंद पडलेल्या कॉन्व्हेंटची इमारत संजयकुमार लक्ष्मणराव चारलीकर यांची असल्याचे तिथे मिळालेल्या विद्युत बिलावरून पोलिसांना कळले. फिर्यादी सपोनि माधव शिंदे यांची तक्रारवरून वणी पोलिसांनी वरील सर्व आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4,5 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मटकापट्टी फाडताना खरबडा येथून युवकाला अटक

खरबडा मोहल्ला येथे मटकापट्टी फाडताना एका युवकाला वणी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. निखील प्रभाकर आयतवार (36), रा. रंगारीपुरा असे अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून मटका पट्टी साहित्यसह रोख 3 हजार 100 रुपये जप्त केले. आरोपीविरुद्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments are closed.