दीपक चौपाटी व भाजीमंडई येथे मटका अड्ड्यावर पोलिसांची धाड

जितेंद्र कोठारी, वणी: शुक्रवार 11 ऑगस्ट व शनिवार 12 ऑगस्ट रोजी येथील दीपक चौपाटी व भाजी मंडई परिसरात मटका जुगार सुरू असलेल्या तीन ठिकाणी पोलिसानी छापा टाकून 6 जणांना अटक करण्यात आली. तर एक फरार आरोपी फरार झाला आहे. मटका जुगार अड्ड्यावरून पोलिसानी वरळी मटका साहित्य व रोख असा 42 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

वणी पोलिस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक अजित जाधव यांना शहरात काही ठिकाणी मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. माहितीवरून पोलिस पथकाने दीपक चौपाटी परिसरात रेड केली असता मटका पट्टी फाडणारा इसम पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसाना या ठिकाणी 15 हजार 500 रुपये रोख रक्कम व डूप्लिकेट बुक मिळाली.

सायंकाळी पुन्हा दीपक चौपटी परिसरात लाकडी टालच्या बाजूने केलेल्या कारवाईत पोलिसांना चार जण मटका पट्टी फाडताना मिळून आले. पोलिसानी चारही आरोपीना अटक करून त्यांच्या कडून 7 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शनिवार 12 ऑगस्ट रोजी भाजी मंडई परिसरात धाड टाकून मटका पट्टी फाडताना दोघांना पोलिसानी अटक केली. आरोपीकडून रोख व मटका साहित्य असे एकूण 19 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल पोलिसानी जप्त केला.

पोलिसानी केलेल्या तिन्ही कारवाईत अमित संतोष झाडे (22 ) रा.शास्त्री नगर, संतोष नामदेव इचवे (27) रा. काळे ले-आऊट, लक्ष्मण रघुनाथ ओंढरे (39) रा. रंगनाथ नगर, शंकर गणपत धंदरे (50) रा. पटवारी कॉलनी, शेख मजहर शेख हसन (26) रा. रंगनाथ नगर व हाफिज अब्दुल सत्तार (43) रा. मोमीनपुरा या 6 आरोपींना अटक करण्यात आली. तर आसिफ खान जमाल खान (40) रा. शास्त्री नगर हा आरोपी फरार झाला.

आरोपींवर कलम 109 भादवी तसेच महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सदर कार्यवाही ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात जमादार विकास धडसे, पोना शुभम सोनुले, सागर सिडाम यांनी केली. शहरात राजरोसपणे सुरु असलेले अवैध व्यवसायांचा समूळ उच्चाटन करण्यासाठी वणी पोलिसांनी कंबर कसली आहे. लपून छपून सुरू असलेले मटका जुगार अड्ड्यावर गेल्या महिन्यांपासून सतत धाडी टाकल्या जात आहे.

Comments are closed.