सिंधी कॉलोनीतील तंबाखू तस्कराच्या घरी पोलिसांची धाड

एक लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त.... मोठे मासे कधी अडकणार ?

विवेक तोटेवार, वणी: शहरातील सिंधी कॉलोनीतील एका तंबाखू तस्करावर वणी पोलिसांनी रेड टाकली. या कारवाईत सुमारे 1. लाख 6 हजारांचा तंबाखू जप्त करण्यात आला. मंगळवारी दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी रोहित सुभाष तारुणा (28) रा. वणी याला पोलिसांनी अटक केली आहे. वणीत अनेक ठिकाणी प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची विक्री सुरु असून या तंबाखूचा परिसरातील गावात पुरवठा होत आहे. या धाडीमुळे शहरातील तंबाखू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

शहरातील सिंधी कॉलोनीतून प्रतिबंधित तंबाखूच्या विक्रीसाठी साठवणूक केली असून पहाटे या तंबाखूचा पुरवठा केला जाणार असल्याची टीप वणी पोलिसांना मिळाली. त्यावरून एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गोपाळ उंबरकर यांनी सहका-यांसह पहाटे पासून सापळा रचला. सकाळी पोलिसांनी टीप मिळालेल्या काही घरी धाड टाकत घराची तपासणी केली. यात रोहित सुभाष तारूणा रा. वणी याच्या घरी सुमारे 48 किलो प्रतिबंधित तंबाखू (किंमत 1 लाख 6 हजार 510 रुपये) आढळून आला. यात मजा कंपनीचे सुगंधीत तंबाखूचे डब्बे व पाऊच आढळून आले.  पोलिसांनी सदर तंबाखू जप्त करून मालाचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवले आहे. सदर तंबाखू भेसळ आहे का? याचा तपास होणे गरजेचे आहे. 

देर आये दुरुस्त आये !
वणीतील रोहित तारुणा हा वणी परिसरातील नामचिन तंबाखू तस्करांपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांपासून तो या धंद्यात आहे. त्याचे विराणी फंक्शन हॉल येथील व्यावसायिक गाळ्यात किराणा मालाचे दुकान देखील आहे. यातूनही तो तंबाखूची चिल्लर विक्री करत असल्याची माहिती आहे. किराणा दुकानातही पोलिसांनी धाड टाकली की नाही, याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. गेल्या काही वर्षांपासून तो या धंद्यात असला तरी अद्याप एकाही ठाणेदारांनी या तस्करावर कारवाई केली नव्हती हे विशेष ! त्यामुळे तारुणा याच्या तस्करीचा व्याप वाढतच चालला होता. मात्र आता या उभरत्या तंबाखू तस्कराच्या मुसक्या आवळल्याने देर आये, दुरुस्त आये अशी प्रतिक्रिया शहरात उमटत आहे.

मोठे मासे कधी अडकणार जाळ्यात
शहरात मोठ्या प्रमाणात तंबाखू तस्करीचे जाळे पसरले आहे. शहरात या तस्करांचे कुठे गोडावून आहेत, याची माहिती अनेकांना आहे. येथून राजरोसपणे तंबाखू शहरात विक्रीसाठी तसेच बाहेरगावी पाठवला जातो. मात्र पोलीस प्रशासनाद्वारे योग्य ती कारवाई होत नसल्याने या तस्करांचे चांगलेच फावत आहे. तारुणा हा तंबाखू तस्करीत नुकताच आलेला एक छोटा मासा आहे. शहरात राजरोसपणे मुरलेले तंबाखू तस्कर आहेत. आता या क्षेत्रातील मोठे मासे कधी अडकणार, अशी प्रतिक्रिया वणीकरांकडून व्यक्त केली जात आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आरोपीवर अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व 2011 चे कलम 26 (1), 26 (2) (lv) 27 (3) (e), 30 (2) (a) , कलम 3(1) (zz) (iv) व 59 तसेच बीएनएसच्या कलम 123 274, 275, 223 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. आरोपी रोहीत तारुणाला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदर कारवाई पोलीस अधिक्षक कुमार चिंता, अप्पर जिल्हा अधिक्षक पियूष जगताप यांच्या आदेशाने वणी SDPO गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात वणी ठाणेदार गोपाळ उंबरकर यांच्या नेतृत्त्वात पोउपनी शेखर वांढरे, सुरेंद्र टोंगे, पोहेका, मारोती पाटील, पोहेका दीपक मडकाम, पोका शाम राठोड, पोका विजय गुजर, पोका महेश बाडलवार, पोका प्रफुल नाईक, जया रोगे, चैताली यांनी पार पाडली.

युवतीला मारला डोळा, मग त्याच्या पोटात उठला गोळा

व्यसनी पती बळजबरी पाजायचा पत्नीला दारू

 

Comments are closed.