जब्बार चीनी, वणी: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राम मंदिराबाबत केलेल्या टिप्पणीचे पडसाद राज्यभरात पडत आहे. याबाबत वणीतही शनिवारी पदसाद उमटले असून श्रीराम नवमी उत्सव समिती, वणी तर्फे रस्त्यावर उतरून निषेध करण्यात आला. दरम्यान शरद पवार यांना “जय श्रीराम” लिहिलेली तब्बल 1 हजार पोस्टकार्ड उत्सव समितीतर्फे पाठविण्यात येणार आहे.
येत्या 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. या सोहळयाची तारीख जाहीर होताच शरद पवार यांनी राम मंदिर बांधल्याने करोना जाणार आहे का? देशाच्या प्रमुखांनी कशाला प्राधान्य दिलं पाहिजे? असा सवाल केला होता. त्यावरून भाजप आणि भाजपच्या मित्र परिवारातून संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. यात आता श्रीराम नवमी उत्सव समितीही उतरली आहे.
शनिवारी श्रीराम नवमी उत्सव समितीचे कार्यकर्ते एकत्र येत त्यांनी रस्त्यावर पवारांच्या वक्तव्याबाबत निषेध व्यक्त केला. तसेच यावेळी पत्रपेटीत शरद पवार यांच्या पत्त्यावर ‘जय श्रीराम’ लिहिलेले काही पत्र पाठवण्यात आले. यावेळी प्रणव पिंपळे, आशिष डंभारे, कौशिख खेरा, पवन खंडाळकर, निखिल झट्टे, अक्षय बोकडे, निखिल एकरे, रुपेश गायधने, अमर कुनकुंतलावार, संदीप आयतवार इत्यादी तरुण उपस्थित होते.
पवारांना प्रभू रामचंद्राची आठवण करून देणार – बेलूरकर
शरद पवार हे मोठे व सन्माननीय नेते आहेत. परंतु प्रभू रामचंद्राच्या विषयात असे नकारात्मक कोणी बोलणार असेल तर त्यांना प्रभु रामचंद्रांची आठवण करून देण्याचे काम आम्ही नेहमीच करीत राहू. त्यासाठी आम्ही त्यांना ‘जय श्रीराम’ लिहिलेली पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आज प्रातिनिधिक स्वरूपात काही पत्र पाठवण्यात आले असून भविष्यात त्यांना 1 हजार पत्र पाठवणार आहोत.
– रवि बेलूरकर, श्रीराम नवमी उत्सव समिती