शिवसेना (उबाठा)–महाविकास आघाडीची प्रभाग 10 मध्ये भव्य रॅली
रॅलीतून उमटला एकजुटीचा आवाज, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बहुगुणी डेस्क, वणी: आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी प्रभाग 10 मध्ये महाविकास आघाडी व शिवसेना (उबाठा) यांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. संचिता विजयराव नगराळे तसेच प्रभाग 10 चे उमेदवार हर्षाली पचारे (अ) आणि संजय पुरावार (ब) यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या रॅलीने संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
रॅलीची सुरुवात मोमिनपुरा येथून झाली. हमिद चौक, जागृती नगर, नटराज चौक, सर्वोदय चौक, मुंबई चौक परिसर अशा महत्त्वाच्या भागातून मार्गक्रमण करताना ढोल-ताशांचा गजर, घोषणाबाजी आणि पक्षाच्या झेंड्यांनी सजलेले दृश्य नागरिकांना आकर्षित करत होते. रस्त्यावर उभ्या असलेल्या नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत केले. महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत उमेदवारांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.
रॅलीदरम्यान बोलताना आ. संजय देरकर म्हणाले, “प्रभाग 10 हा वणी शहरातील महत्त्वाचा प्रभाग आहे. या भागाचे सर्वांगीण विकासकामे करण्याची जबाबदारी आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडू. महाविकास आघाडीने नेहमीच विकासाचे राजकारण केले आहे आणि या निवडणुकीतही आमचे उमेदवार विकासाच्या मुद्द्यांवर ठाम आहेत.” त्यांनी नागरिकांना येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना संधी देण्याचे आवाहन केले.
उमेदवार हर्षाली पचारे आणि डॉ. संचिता नगराळे यांच्या उपस्थितीमुळे महिलांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. अनेक महिला उमेदवारांशी संवाद साधत परिसरातील समस्या, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा करताना दिसल्या. महिलांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आघाडीचे उमेदवार आणखी आत्मविश्वासाने पुढे जात असल्याचे जाणवले. रॅलीचा शेवट सर्वोदय चौकात थाटात करण्यात आला. नागरिकांनी उमेदवारांचे मनापासून स्वागत करत त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. तरुण कार्यकर्त्यांची गर्दी, जयघोष आणि ढोल-ताशांचा गजर यामुळे रॅलीला वेगळाच जल्लोषमय रंग मिळाला.

या रॅलीतून स्पष्ट झाले की प्रभाग 10 मध्ये निवडणूक ही केवळ पक्षीय स्पर्धा नसून नागरिकांच्या अपेक्षा, महिलांचा सहभाग आणि विकासाच्या मुद्द्यांवर आधारित लढत असेल. महाविकास आघाडीने दिलेला एकजुटीचा संदेश आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हे आगामी निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवा आकार देऊ शकतात. या रॅलीत आ. संजय देरकर, संजय खाडे, राजू उंबरकर, संजय निखाडे यांच्यासह काँग्रेस, शिवसेना (उबाठा), मनसे, संभाजी ब्रिगेड, भीम आर्मी आदी पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वच पक्षांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ एकजुटीचा संदेश दिला.



Comments are closed.