कौटुंबिक वादातून मुलीला वडिलांची मारहाण

आरोपी वडिलांविरोधात गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील रंगारीपुरा भागात कौटुंबिक वादातून मुलीला मारहाण झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी दिनांक 20 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली.

मुलीने दिलेल्या तक्रारीवरून, मुलगी (18) ही तिच्या आईसह रंगारीपुरा येथे राहते. आई वडिलांचे पटत नसल्याने तिचे वडील हे तीच्या आजी आजोबासोबत राहतात. दिनांक 20 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास तक्रारदार मुलीचे वडील घरी आले.

त्यांनी पत्नीशी वाद घातला. दरम्यान मुलीने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापलेल्या वडिलांनी तिचा हात जोरात मुरगाळला. या मारहाणीमुळे श्रद्धाच्या हाताला फ्रॅक्चर झाले असून सूज व दुखापत झाली आहे. यानंतर वडिलाने पत्नी व मुलीला शिवीगाळ करत जीवाने मारण्याची धमकी दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

जखमी मुलगी व आई यांनी तत्काळ पोलीस स्टेशनला धाव घेतली. पोलिसांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात पाठविले. तेथे प्राथमिक उपचारानंतर एक्स-रे करण्यात आला असता हाताला फ्रॅक्चर असल्याचे निष्पन्न झाले. वैद्यकीय कागदपत्रांच्या आधारे आरोपी वडिलांवर बीएनएसच्या कलम 117(2), 351(2), 351(3), 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून पुढील तपास सुरू आहे.

(बातमीतील इमेज एआय जनरेटेड आहे)

Comments are closed.