प्रभाग रचना सदोष असल्याचा वंचितचा आरोप, प्रभाग यादीची होळी

वणी न.प. प्रभागाची फेर रचना करण्याची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: वणी नगरपरिषदेसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी नव्याने करण्यात आलेली प्रभाग रचना यादी दोषपूर्ण असून सर्व प्रभागाची फेररचना करण्यात यावी. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली आहे.  वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वात सोमवार 14 मार्च रोजी स्थानिक शिवाजी महाराज चौकात नवीन प्रभाग रचनेचा निषेध करून यादीची होळी करण्यात आली. प्रभाग रचनेबाबत जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांच्याकडे आक्षेपही नोंदविण्यात आले आहे.

नवीन प्रभाग रचनामध्ये शहराचे 14 प्रभाग तयार करण्यात आले आहे. परंतु ही प्रभाग रचना शहर नकाशा व कायदेशीर हद्दवाढीनुसार तयार करण्यात आली नसल्याचा आक्षेप दिलीप भोयर यांनी नोंदविला आहे. वणी नगर परिषदेने हद्दवाढी बाबत दि.20 मे 2016 रोजी आयोजित विशेष सर्व साधारण सभेमध्ये घेतलेल्या ठरावानुसार केवळ जैन ले आउट, काळे ले आउट व भोंगळे ले आउट नगर परिषद हद्दवाढीत दर्शविण्यात आले आहे. वणी गावातील गाव नंबर 337 मधील वरील ले आउट वगळता हद्दवाढीला पूर्व पश्चिम व उत्तर बाजूचे अंदाचे 70 सर्वे नंबर ठराव नसतांना वणी नगरपरिषद हद्दीत दि. 28 मार्च 2018 च्या अधिसूचनेनुसार समाविष्ट करण्यात आले.

लालगुडा येथील सर्वे नंबर 9 व 39 वणी नगर परिषदेच्या अधिसूचनेत नसतांना हद्द वाढीचा नकाशा बनविताना ते वणी न. प. च्या हद्दीत दाखविण्यात आले. तसेच वणी गावाचे सर्वे नंबर 136 व 137 अधिसूचनेनुसार दर्शविले नाही. परंतु नकाशा काढतांना ते हद्दीच्या बाहेर येत आहे. नगर विकास विभाग मुबई परिपत्रक क्रमांक GEN/10883/1919/CR-32/83/UD-11 नुसार लालगुडा गावचे दोन सर्वे नंबर वणी हद्दीत अधिसूचनेनुसार आल्यामुळे पूर्ण लालगुडा गावाचे सर्वे नंबर वणी न.प. हद्दीत घ्यावे लागतात. ते घेतलेले नाही. त्यामुळे सक्षम अधिकाऱ्यांच्या सहीचा नकाशा 4 वर्ष पूर्ण होवुनही बनू शकला नाही.  दि. 8 मार्च 2019  ला वणी नगर परिषदेचा वाढीव विकास आराखडा (सन 1924 च्या हद्दीतील) मंजूर झाला. त्याचा नकाशा सक्षम अधिकाऱ्यांच्या सही निशी नगर परिषदने प्रदर्शित केला.

परंतु दि.28 मार्च 2018 च्या अधिसूचनेनुसार हद्दवाढीचा नकाशा अजून पर्यंत नगर परिषद वणी, सहाय्यक संचालक नगर रचना यवतमाळ, सह संचालक नगर रचना विभाग अमरावती व संचालक नगर रचना विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे उपलब्ध नाही. असे असतांना वणी नगर परिषदेची 2022 ची सार्वत्रिक निवडणूक  कोणत्या हद्दवाढनुसार होणार ? असा आक्षेप वंचित आघाडी कडून नोंदविण्यात आला आहे.

प्रभाग रचनेबाबत जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी नुकतीच प्रकाशित केलेली दोषपूर्ण प्रभाग रचना रद्द करून प्रभागाची फेररचना तयार करण्यात यावी. असे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांचे नेतृत्वात देण्यात आले. यावेळी वंचितचे जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग, शहराध्यक्ष किशोर मुन, अनिल खोब्रागडे, प्रा. आनंद वेले, महिला शाखेच्या शहराध्यक्षा अर्चना नगराळे, वैशाली गायकवाड, कपिल मेश्राम, शंकर रामटेके, राहुल मेलपल्लीवार, संकेत नगराळे, विलास दुर्गे, सचिन मडावी, सुनील पानतावणे, अनिल खोब्रागडे, अजय खोब्रागडे यांचे सह वंचित बहुजन आघाडीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.