वेकोलि क्षेत्रातील समस्या सोडवण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना

भालर येथील बैठकीत वेकोलि अधिका-यांकडून घेतला समस्यांचा आढावा

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील वणी नॉर्थ व वणी वेकोलि क्षेत्रात येणा-या गावांमध्ये कोळसा खाणीमुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या तात्काळ सोडवाव्यात, अशी सूचना खा. प्रतिभा धानोरकर यांनी वेकोलि अधिका-यांना केली. दिनांक 12 सप्टेंबर रोजी भालर येथील वेकोलि कार्यालयात खा. प्रतिभा धानोरकर यांची आढावा बैठक झाली. वेकोलि क्षेत्रांतर्गत येणा-या विविध गावांतील समस्यांचा त्यांनी अधिका-यांकडून आढावा घेतला. यावेळी संजय खाडे यांनी खा. प्रतिभा धानोरकर यांच्या मार्फत वेकोलि क्षेत्रात येणा-या गावातील विविध समस्यांना वाचा फोडली. तसेच या समस्या सोडवण्याबाबत अधिकारी यांना निवेदन दिले.

कोलेरा-पिंपरी व उकणी गावांचे पूनर्वसन करावे, कुंभारखनी गाव व परिसरातील शेतक-यांनी वेकोलिसाठी जमीन दिली. मात्र त्यांना जमिनीचा अद्यापही योग्य मोबदला व कंपनीत रोजगार दिला गेला नाही. त्यांना ओलित शेतजमिनीप्रमाणे मोबदला व कंपनीत नोकरी द्यावी, स्थानिक बेरोजगारांना वेकोलिसाठी काम करणा-या खासगी कंपनीत नोकरीत प्राधान्य द्वावे, ब्राह्मणी (निळापूर) येथील कोलवॉशरीच्या धुळीमुळे पिकांचे नुकसान होत आहे, त्यामुळे शेतक-यांना योग्य तो मोबदला द्यावा. उकणी गावातील उर्वरीत 10 टक्के जमीन तात्काळ अधिग्रहित करावी.

निळापूर येथील गुंडा नाल्यावर पूल बांधावा, कोळशाची ओव्हरलोड वाहतूक बंद करण्यात यावी, वणी ते अहेरी रोड (बोरगाव) येथील रस्त्यालगत शेती असलेल्या शेतक-यांना 20 वर्षांपासून रखडलेला मोबदला त्वरीत द्यावा, ओबी टाकल्याने ब्राह्मणी नवीन वस्ती येथील शेतक-यांचे नुकसान झाले आहे. त्यांना तात्काळ मोबदला द्यावा, वेकोलि परिसरात झाडे झुडपे साफ करावे, लालगुडा ते उकणी रस्त्याची दुरुस्ती करावी, वणी ते प्रगती नगर कॉलोनी पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण किंवा सिमेंटीकरण करावे, चारगाव चौकी-शिंदोला-कोरपना रस्त्यावरील ओव्हरलोड वाहतूक बंद करावी व या रस्त्याचे सिमेंटीकरण करावे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वणी व वणी नॉर्थ क्षेत्रात येणा-या विविध समस्यांबाबत वारंवार निवेदन देण्यात आले. मात्र वेकोलि प्रशासनाने याची अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे वेकोलि प्रशासनाबाबत सर्वसामान्य जनतेत रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे या समस्यांची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा गावक-यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांनी निवेदनातून वेकोलिला दिला आहे.

Comments are closed.