प्रवीण खानझोडे यांचा शिवसेना (उबाठा) ला जय महाराष्ट्र !

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठाला धक्का ! पक्ष सोडण्याचे कारण काय?

 

बहुगुणी डेस्क, वणी: सामाजिक कार्यकर्ते, आंबेडकरी व बहुजनवादी चळवळीतील सुपरिचित कार्यकर्ते प्रवीण खानझोडे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत जय महाराष्ट्र केला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्ष सोडल्याचे जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. सध्या तरी त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचे कारण व्यावसायिक व्याप असे दिले असले, तरी स्थानिक नेतृत्त्वाने केलेले दुर्लक्ष याला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. प्रवीण खानझोडे हे तळागाळातील एक कार्यकर्ते असून त्यांची आंबेडकरी व बहुजनवादी मतदारांमध्ये चांगली पकड आहे. त्यांचे पक्ष सोडून जाण्याने शिवसेनेला आगामी निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रवीण खानझोडे हे मुळचे आंबेडकरीवादी चळवळीतून आलेले कार्यकर्ते आहे. बसपामध्ये त्यांनी विविध पद त्यांनी भूषवली. जिल्ह्यातील बसपाचे एक ऍक्टिव्ह कार्यकर्ते व नेते म्हणून त्यांची ओळख होती. मात्र चार वर्षाआधी त्यांनी बसपा सोडत त्यांनी शिवसेना जॉईन केली होती. मात्र हा घरोबा केवळ चार वर्षांचाच ठरला. त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली की खाजगी कामामुळे पक्षाला पुरेसा वेळ देता नाही. त्यामुळे यापुढे शिवसेने (उबाठा) पक्ष व संघटनात्मक बाबीशी कुठलाही संबंध राहणार नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

स्थानिक नेतृत्त्वाबाबत नाराजी ?
शिवसेना उबाठाने वणी विधानसभेत विजय मिळवल्यानंतर अनेक पक्ष सोडून गेलेले लोक आणि कट्टर शिवसैनिक पुन्हा पक्षात परतले. त्यामुळे पक्षात नवचेतना आली. मात्र असे असताना खानझोडे यांचे पक्ष सोडून जाण्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असे बोलले जात आहे की स्थानिक नेतृत्ताचा एक सिलेक्टेड गोतावळा आहे. या गोतावळ्याच्या बाहेर ते अद्यापही आलेले नाही. जरी स्थानिक नेतृत्त्व स्वच्छ प्रतिमेचे असले तरी त्यांच्या गोतावळ्यात चापलूस आणि सेटरचा भरणा आहे, यात काही प्रामाणिक कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत आहे. असा आरोप स्थानिक नेतृत्त्वावर होतो. गेल्या पाच सहा महिन्यांपासून स्थानिक नेतृत्त्वाचा पक्षाचे काही कार्यकर्ते यांच्यात संवाद देखील नाही. खानझोडे यांची देखील हीच नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

शिवसेनेला बसणार फटका ?
प्रवीण खानझोडे हे ओबीसी समाजातून येत असले तरी ते मुळचे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आहे. एक कॅडरबेस व अभ्यासू कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक वर्ष ते बसपा या पक्षात होते. जिल्हा पातळीवरचे पद देखील त्यांच्याकडे होते. बौद्ध, दलित व बहुजन मतदारांमध्ये त्यांची चांगली पकड आहे. तसेच इव्हेंट, सभा मॅनेजमेंट यात त्यांचा चांगला हातखंडा आहे. याचा पक्षाला विधानसभेत चांगला फायदा झालेला दिसून आला. राजूर सर्कलमध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क मानला जातो. त्यांच्या पत्नी वृशाली खानझोडे या पंचायत समिती राजूर गणातून निवडून आल्या होत्या. लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेची निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर खानझोडे यांनी अचानक पक्षाला जय महाराष्ट्र केल्याने शिवसेनेला फटका बसणार का? याची सध्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

खानझोडे यांनी पक्ष संघटनेशिवाय विविध सामाजिक संघटनेत विविध पदं भूषवली आहे. त्यांच्याकडे बसपात असताना जिल्हा पातळीवरचे पद होते. मात्र पक्ष प्रवेश होऊन चार वर्ष झाले तरी अद्यापही त्यांच्याकडे कुठलेही पद नव्हते. ते त्यांनी घेतले नव्हते की त्यांना दिले गेले नव्हते याबाबत दुमत आहे. राजकीय अभिलाषा, नेतृत्त्वाचा कार्यकर्त्यांशी तुटलेला संवाद की इतर पर्यायामुळे त्यांनी पक्ष सोडला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. ते पुढील भूमिका काय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

Comments are closed.